मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनल सामन्याला आता काही दिसव बाकी आहेत. सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाला इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. या कसोटी सामन्यामध्ये किंग विराट कोहली आणि भरवशाचा फलंदात चेतेश्वर पुजारा यांना मोठा विक्रम करण्याची संधी आहे. विक्रम करणं सोडा संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांचाच विक्रम मोडित काढण्याची दोघांना संधी आहे.
हा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीच्या आकडेवारीशी संबंधित आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांपैकी सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आता चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांनाही WTC च्या अंतिम फेरीत राहुल द्रविडला मागे सोडण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत राहुल द्रविडने 32 कसोटी सामन्यांच्या 60 डावात 2143 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 24 कसोटी सामन्यांच्या 43 डावात 2033 धावा केल्या आहेत. म्हणजे, जर राहुल द्रविडला मागे सोडायचे असेल तर पुजाराला WTC फायनलच्या 110 धावा कराव्या लागतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 24 कसोटी सामन्यांच्या 42 डावांनंतर विराट कोहलीच्या 1979 धावा आहेत आणि तो 5व्या क्रमांकावर आहे. पण, राहुल द्रविडलाही मागे सोडणे फार दूर नाही. सध्या पुजारापासून ५४ धावा दूर असलेल्या विराट कोहलीला द्रविडचा विक्रम मोडण्यासाठी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या दोन्ही डावात 164 धावा कराव्या लागणार आहेत.
दरम्यान, ओव्हलवरच्या मैदानावर विराट कोहलीने 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावात 28.16 च्या सरासरीने केवळ 169 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, चेतेश्वर पुजाराने 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावात 19.50 च्या सरासरीने फक्त 117 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी पाहता विक्रम मोडणं अवघड मानलं आहे.