मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद कोणीच विसरू शकत नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर यानेही उडी घेतली होती. वादाने गंभीर रूप धारण केल्यानंतर बऱ्याच तू तू मै मै नंतर प्रकरण शांत झालं. पण यानंतर सोशल मीडियावर हा वाद सुरुच असल्याचं पाहिलं गेलं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत हा वाद खऱ्या अर्थाने संपुष्टात आला. विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी वादावर पडदा टाकत काहीच झालंच नाही असं सांगितलं. आता हा वाद मिटल्यानंतर गौतम गंभीरने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गौतम गंभीरने एएनआय पॉडकास्टवर बोलताना आपली भूमिका मांडली आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर म्हणून भूमिका बजावलेल्या गौतम गंभीर याने वादावर बोलताना सांगितलं की, “हे माझं काम होतं की मी माझ्या खेळाडूच्या बचावासाठी यावं. माझ्या खेळाडूसोबत कोणतरी चुकीचं वागावं याचा अधिकार मी त्याला देणार नाही. एक मेंटॉर म्हणून माझं कर्तव्य आहे की, खेळाडूचा बचाव करावा आणि प्रत्येक वाईट गोष्टींपासून दूर करावं.”
“एक मेंटॉर म्हणून तसा विचार करणं थोडं वेगळं आहे. पण माझ्या खेळाडूंसोबत कोणी वाईट वागत असेल तर मी ते बघू शकत नाही. जर मैदानात सामना सुरु असताना काही घडलं तर मी तिथे काहीच करू शकत नाही. पण सामना संपल्यानंतर कोणी माझ्या खेळाडूसोबत तसं वागत असेल तर मी त्या खेळाडूच्या बचावासाठी उभा राहीन. हा माझा अधिकार आहे.”, असं गौतम गंभीरने स्पष्टपणे सांगितलं.
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद आता संपुष्टात आला आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामन्यात या दोघांनी हातमिळवणी केली. त्यामुळे आता सर्वकाही ठिक झालं आहे असंच म्हणावं लागेल. आयपीएल 2023 मध्ये गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. आता गंभीरने कोलकात्या नाईट रायडर्ससोबत हातमिळवणी केली आहे. गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये जेतेपद जिंकलं होतं.