टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहली विजयाचा वाटेकरी ठरला. संपूर्ण स्पर्धेत फेल गेल्यानंतरही त्याच्यावर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी विश्वास टाकला. एक क्लास खेळाडू असून तो मोठ्या सामन्याचा खेळाडू असल्याचं रोहित शर्मा आधीच बोलला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काहीच बदल होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं होतं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित-विराट जोडी मैदानात उतरली. पण रोहित शर्मानंतर आणखी दोन गडी बाद झाल्यानंतर टीम इंडियावर दडपण आलं. पण विराट कोहलीने एक बाजू सावरून धरली. कमी स्ट्राईक रेटचा ठपका लागला तरी त्याने केलेल्या धावाच महत्त्वाचा ठरल्या. विराट कोहलीने 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पण विराट कोहलीने या विजयानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. कर्णधार रोहित शर्मा त्याच्या निवृत्तीनंतर भरभरून बोलला.
“विराट कोहलीच्या फॉर्मबाबत कोणालाच शंका नव्हती. त्याच्या काय क्षमता आहे हे आम्हाला माहिती आहे. मोठ्या सामन्यात कसं खेळायचं हे त्याला माहिती आहे. विराट कोहली आम्हाला सामन्यात शेवटपर्यंत नेतो. आम्हाला शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहील असा फलंदाज हवा असतो. ही अशी खेळपट्टी नव्हती की नवीन फलंदाज येईल आणि खेळून जाईल. त्यामुळे विराट कोहलीचा अनुभव कामी आला. मी एक असा खेळाडू आहे की विराटला इतकं वर्षे खेळताना पाहात आहे. मलाही अजून कळलं नाही की तो हे कसं करतो. तो एक मास्टरक्लास प्लेयर आहे. त्याच्याकडे कौशल्य आहे आणि त्याचा आत्मविश्वासाबाबत काहीच तोड नाही.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सामन्यानंतर सांगितलं.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.