विराट-गंभीर यांच्या हायव्होल्टेज मुलाखतीचा ट्रेलर रिलीज, 100 सेकंदात बरंच काही सांगून गेले

| Updated on: Sep 18, 2024 | 2:43 PM

प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या मुलाखतीचा एक ट्रेलर बीसीसीआयने ट्वीट केला आहे. यावेळी दोघांना एकत्र पाहून अनेकांना धक्का बसला. या 100 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये पुढे काय असेल याची झलक दिसली. नेमकं काय आहे ते समजून घ्या

विराट-गंभीर यांच्या हायव्होल्टेज मुलाखतीचा ट्रेलर रिलीज, 100 सेकंदात बरंच काही सांगून गेले
Follow us on

विराट कोहली आणि गौतम गंभीरला एकत्र मुलाखत देताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या दोघांबाबत अनेकदा वाद झाल्याचं समोर आलं आहे. खऱ्या अर्थाने मसाला म्हणून त्या बातम्यांकडे पाहिलं जातं. त्यामुळे या दोघांना एकत्र पाहून आश्चर्य वाटणार यात काही शंका नाही. बीसीसीआयने मुलाखतीचा एक ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात दोघंही दिलखुलासपणे चर्चा करताना दिसले. तसेच एकमेकांची स्तुती करताना मागेपुढे पाहिलं नाही. आयपीएलमध्ये भिडलेले हे दोघं तेच आहेत का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पण मागचं झालेलं सर्व विसरण्याची वेळ आता क्रीडाप्रेमींवर आली आहे. कारण मुलाखतीत दोघंही या विषयावर जोरजोरात हसताना दिसले. बीसीसीआयने शेअर केलेल्या 100 सेकंदाच्या व्हिडीओतून हे चित्र दिसून आलं आहे. या व्हिडीओची सुरुवात 2011 वनडे वर्ल्डकपपासून झाली. 2014 ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचाही यात उल्लेख झाला.

व्हिडीओची सुरुवात 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत विराट कोहली आणि गौतम गंभीरने केलेल्या विजयी भागीदारीने होते. त्यानंतर गौतम गंभीर चर्चेला सुरुवात करतो आणि 2014 च्या ऑस्ट्रेलिया कसोटीची आठवण काढतो. दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्ध नेपियरमध्ये स्वत: खेळलेल्या खेळीची तुलना करत विराटची तोंडभरून स्तुती करतो. या दरम्यान दोघांमध्ये आक्रमकता आणि विरोधी संघांसोबत झालेल्या भांडणांबाबत चर्चा होते. विराट लगेच विचारतो की, ‘भांडणामुळे तुला प्रेरणा मिळते की नुकसान होतं.’ गौतम गंभीर या प्रश्नावर लगेच हसतो आणि म्हणतो, ‘माझ्यापेक्षा जास्त तुझी भांडणं झाली आहेत. याचं उत्तर तूच देऊ शकतोस.’ त्यानंतर दोघंही जोरजोरात हसतात.

राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरने हे पद स्वीकारलं आहे. जुलै महिन्यापासून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे विराट आणि गंभीर या दोन तलवारी एकाच म्यानात राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण आयपीएल 2023 स्पर्धेत या दोघांमध्ये जबरदस्त भांडणं झाली होती. इतकंच काय तर 10 वर्षांपूर्वी हे दोघांही भिडले होते. त्यामुळे आता काही खरं नाही असंच वाटत होतं. पण बीसीसीआयने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमुळे या दोघांमध्ये तसं काही नसल्याचं दिसून आलं आहे.