पर्थमधील विजयी सुरुवातीनंतर टीम इंडिया अॅडलेडमध्ये कागारुंवर मात करण्यात अपयशी ठरली. यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातच टीम इंडियाचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आणि पर्थ कसोटीतील पराभवाचा हिशोब क्लिअर केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी या सामन्यातही निराशा केली. काहींनी संघर्ष केला. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी घोर निराशा केली. विराटने पर्थमध्ये शतक झळकावलं होतं. विराटची अॅडलेडमध्ये बॅट तळपते. त्यामुळे विराटकडून अनेक आशा होत्या. मात्र विराटला अपेक्षांवर खरं उतरता आलं नाही. विराटने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 11 धावा केल्या. विराटने या पराभवाच्या आणि धावांच्या अपयशानंतर मोठा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयाचं लिटील मास्टर सुनील गावसकर यांनीही कौतुक केलंय.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा सामना हा 14 ते 18 डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेन, गाबा येथे होणार आहे. विराट दुसऱ्या कसोटीतील पराभवांनतर वेळ न दवडता तिसऱ्या सामन्याच्या अनुषंगाने नेट्समध्ये जाऊन बॅटिंगचा सराव करु लागला. विराटच्या या निर्णयाचं गावसकर यांनी कौतुक केलं. गावसकर यांनी ब्रॉडकास्टर्सह बोलताना म्हटलं की विराटला इतर खेळाडूंकडूनही असंच अपेक्षित आहे.
“विराटने आज नेट्समध्ये जाऊन त्याचं समर्पण दाखवून दिलं. मात्र मला इतर खेळाडूंकडूनही विराटसारखीच अपेक्षा आहे. विराटने धावा केल्या नाहीत. विराटने देशासाठी जे काही केलंय, त्यासाठी त्याला फार गर्व आहे. विराटने या सामन्यात धावा केल्या नाहीत, त्यामुळे तो नेट्समध्ये आहे. तो कठोर मेहनत करतो, घाम गाळतोय आणि हेच पाहणं अपेक्षित आहे. कठोर मेहनतीनंतरही तुम्ही आऊट झालात, तर काही हरकत नाही, कारण हा खेळ आहे. तुम्ही एक दिवस धावा कराल, एक दिवस विकेट घ्याल, दुसऱ्या दिवशी नाही. मात्र तुम्हाला प्रयत्न करत रहावे लागतील. विराट मेहनत करतोय, तो मेहनत करतोय. त्यामुळे विराटने जरी पुढील सामन्यात धावा केल्या नाहीत, तरी मला आश्चर्य वाटणार नाही”, असं गावसकर यांनी म्हटलं.