मुंबई : आयसीसी स्पर्धा जिंकून भारतीय संघाला दहा वर्षांचा काळ लोटून गेला आहे. आता वनडे वर्ल्डकपच्या निमित्ताने भारतीय संघाला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. खासकरून वनडे वर्ल्ड भारतीय भूमीत होत असल्याने भारताला मोठी संधी आहे. आयसीसीने वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आजपासून 100 दिवसांनी वर्ल्डकप असणार आहे. क्रिकेट इतिहासात भारत पहिल्यांदाच एकहाती वर्ल्डकपचं आयोजन करणार आहे. यापूर्वी भारताने 1987, 1996 आणि 2011 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशसोबत एकत्र येत स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आता संपूर्ण वर्ल्डकप भारतात होणार असल्याने भारतीय संघाचे खेळाडू सज्ज झाले आहेत. विराट कोहली यानेही वेळापत्रक जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया जाहीर केली आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2019 च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. पण न्यूझीलंडने उपांत्य फेरीत भारताला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे भारतीय संघाचं वनडे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. भारताने शेवटचं आयसीसी जेतेपद महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये जिंकलं होतं. त्यानंतर आतापर्यंत चषकांचा दुष्काळ कायम आहे.
विराट कोहली 2011 वर्ल्डकप संघात खेळला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.”वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला मुंबईत खेळायचं आहे. मला 2011 वर्ल्डकप वेळीचा अनुभव पुन्हा एकदा घ्यायचा आहे.”, असं विराट कोहली याने आयसीसीला सांगितलं.
“मी तेव्हा तरुण होतो. मी तेव्हा माझ्या वरिष्ठ खेळाडूंना पाहिलं आहे. मी समजू शकतो कशा प्रसंगातून गेले असतील. वर्ल्डकप होम ग्राउंडमध्ये खेळणं किती खास आहे. ते किती उत्साही होते मी पाहिलं आहे.”, असं विराट कोहली याने सांगितलं.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा भारतीय संघाचा सामना क्वॉलिफायर दोन संघासोबत वानखेडे स्टेडियमवर असणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबर 2023 रोजी असणार आहे. तसेच 15 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
भारतीय संघ एकूण 9 सामने खेळणार असून मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, पुणे, धर्मशाळा, लखनऊ, कोलकाता आणि बंगळुरु येथे सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना 9 ऑक्टोबरला चेन्नईला होणार आहे.