भारतीय क्रिकेट विश्वातील विराट कोहली हे मोठं नाव आहे. त्याने आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दित एक एक करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. तसेच अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे विराट कोहलीचा संपूर्ण जगात एक वेगळाच चाहता वर्ग आहे. विराट कोहलीसोबत सेल्फी असो की त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी होते. देशात मनमोकळेपणानं फिरणं कठीण होतं. त्यामुळे विराट कोहली सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी विदेश दौऱ्यावर असतो. खासकरून लंडनमध्ये विराट कोहली बऱ्याचदा गेल्याचं दिसून आलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर विराट कोहली लंडनला गेला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका खेळला आणि आता पुन्हा लंडनला गेला आहे. लंडनमधील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली एकटाच रस्ता पार करताना दिसत आहे.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या दोन मुलांसह लंडनमध्ये आहे. विराट कोहलीला जेव्हा कधी क्रिकेटमध्ये ब्रेक मिळतो तेव्हा लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतो. विराट कोहलीने यापूर्वी काही मुलाखतींमध्ये मनमोकळेपणाने राहायचं असल्याचं सांगितलं होतं. मुलाखतीत त्याने दिल्लीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेच मार्केटमधील आठवणींमध्ये रमला होता. पण स्टारडममुळे आता असं मोकळेपणाने फिरणं कठीण झालं आहे. दुसरीकडे, विराट कोहली लंडनमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.
Virat Kohli on the London streets. 🐐pic.twitter.com/0WvBi9byXZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 14, 2024
विराट कोहली आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वनडे क्रिकेट खेळला. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला पण काही खास करू शकला नाही. तिन्ही वनडे सामन्यात धावा करताना कस लागला. दुसरीकडे, विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार अशी चर्चा होती. पण त्या बातम्यांना पूर्णविराम लागला आहे. विराट कोहली आता थेट बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात दिसणार आहे. विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीचा खरं तर हा शेवटचा टप्पा सुरु आहे. टी20 क्रिकेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीचं फिटनेस पाहता आणखी वनडे-कसोटीमध्ये चार ते पाच वर्षे क्रिकेट खेळू शकतो. फॉर्म कायम राहिला तर आणखी काही काळ त्याच्या फलंदाजीचा आनंद चाहत्यांना लुटता येईल. दरम्यान या काळात विराट कोहली काही विक्रमांना गवसणी घालणार हे निश्चित आहे.