मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) सध्या ब्रेकवर आहे. कुटुंबासह लंडन आणि पॅरिसचा प्रवास विराट करतोय. पण, जर तुम्हाला वाटत असेल की त्याचा ब्रेक लांबेल, आशिया चषकापूर्वी त्याची सुट्टी संपणार नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण, विराट कोहलीला टीम इंडियात (Indian Cricket team) हजेरी लावण्याची ऑर्डर मिळाली आहे. यामुळे पुन्हा एकदा विराटसाठी ही चांगलं आणि सकारात्मक चिन्ह असल्याचं मानलं जातंय. झिम्बाब्वे (zimbabwe) मालिकेत खेळताना दिसावं, अशी टीम इंडियाच्या निवड समितीची इच्छा आहे. निवड समितीच्या या इच्छेमागे विराट कोहलीच्या आउट ऑफ फॉर्मचा हात आहे. वास्तविक, संघ निवड समितीला विराट कोहलीनं त्याच्या फॉर्ममध्ये यावं असं वाटतंय. पण, आता याला विराट कसं मनावर घेतो, हे देखील महत्वाचं आहे. यापूर्वी विराटच्या खराब कामगिरीमुळे तो त्याच्याच चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता. त्यावेळी त्याला टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे विराटचे खूप खराब दिवस चालू आहेत, असंही बोललं गेलं.
भारताला झिम्बाब्वेविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यात विराट कोहलीला खेळवायचे आहे. ही भारतीय निवड समितीची इच्छा आहे. इनसाइडस्पोर्टशी बोलताना निवड समितीचा एक सदस्य म्हणाला, ‘आशा आहे की, त्याला मिळालेल्या ब्रेकमुळे त्याला मानसिक बळ मिळेल आणि तो आपला फॉर्म परत मिळवू शकेल. पण, सत्य हे देखील आहे की आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याशिवाय तुम्ही फॉर्ममध्ये परत येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळावे, अशी आमची इच्छा आहे. विराट एकदिवसीय क्रिकेटलाही महत्त्व देतो आणि येथे खेळल्याने त्याला आशिया चषकापूर्वी हरवलेला फॉर्म परत मिळवता येईल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आम्ही संघ निवडीच्या वेळी घेऊ,’ असं निवड समितीचा तो सदस्य इनसाइडस्पोर्टशी बोलताना म्हणाला.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारत आपला बी-टीम पाठवेल. त्यामुळे सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. त्या संघाची कमान बहुधा शिखर धवनच्या हाती असेल. त्या मालिकेत विराट कोहलीनंही खेळावे अशी भारतीय निवडकर्त्यांची इच्छा आहे. परंतु समस्या अशी आहे की या मालिकेनंतर भारताला आशिया चषक लगेच खेळावा लागणार आहे. जो आता श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये होऊ शकतो. झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहलीने एक महिन्याची सुट्टी घेतल्याचं वृत्त यापूर्वी आलं होतं. आता ऑगस्टच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत तो थेट खेळताना दिसणार आहे. विराट कोहली 1 ऑगस्टपासून आशिया चषकाची तयारी सुरू करणार होता. मात्र, आता त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळावं आणि हरवलेला फॉर्म सावरण्याचा प्रयत्न करावा, अशी निवड समितीची इच्छा आहे.