मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुढील वाटलीबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचं वय आणि तरूण खेळाडूंना संधी असे दोन प्रश्न क्रीडाप्रेमींच्या मनात घोळत आहेत. रोहित आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त खेळी केली आहे. त्यामुळे त्यांनी आगामी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळावं अशी काही क्रीडा तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्माच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे सांगणं आतातरी कठीण आहे. पण काही घडामोडी पाहता अंदाज बांधता येऊ शकतो. विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौरा आहे. पण या दौऱ्यातही विराट कोहली खेळणार नसल्याचं समोर आलं आहे.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया सर्वात आधी 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर 3 वनडे सामन्यांची मालिक होणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या स्पर्धेसाठी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पण या दौऱ्यात विराट कोहलीने व्हाईट बॉल म्हणजे टी20 आणि वनडे खेळण्यास नकार दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार त्याने व्हाईट बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे.
विराट कोहलीच्या हा निर्णय फक्त मालिकेपुरता मर्यादीत आहे की कायमस्वरूपी याबाबत काही माहिती नाही. व्हाईट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी कधी तयार होणार? याबाबतची माहितीही तो स्वत: बीसीसीआयला देणार आहे. त्यामुळे आता व्हाईट बॉल क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा फॅन्समध्ये रंगली आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने त्याच्या पुढील वाटचालीबाबत काहीच सांगितलेलं नाही. रोहित शर्मा सुद्धा कसोटी खेळताना दिसेल असं सांगितलं जात आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. रोहित शर्माने व्हाईट बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला तर केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांचा कर्णधारपदासाठी विचार होऊ शकतो. सहा महिन्यांच्या कालावधीत रोहित आणि विराट टी20 मालिका खेळले नाही तर वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत साशंकताच आहे.