टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध आहे. तर अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. न्यूयॉर्कच्या नसाउ कॉउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने रोहित शर्मा आणि टीमला एक सल्ला दिला आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. वसीम जाफर याच्या मते, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल याने ओपनिंग करावं. याबाबत वसीम जाफर याने एक ट्वीट केलं आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, ‘कोहली आणि जयस्वालने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ओपन करावं. रोहित आणि सूर्यकुमारने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळावं. रोहित आणि सूर्याचा क्रम टीमला सुरुवात कशी मिळाली आहे यावर ठरवावा. रोहित शर्मा फिरकीपटूंना चांगला खेळतो. त्यामुळे त्याने चौथ्या क्रमांकावर उतरण्यास हरकत नाही.’ असं पोस्ट टाकत त्याने हॅशटॅग टी20 वर्ल्डकप, भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध आयर्लंड केलं आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या प्रवासाची सुरुवात 5 जूनपासून होणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडसोबत आहे. हा सामना न्यूयॉर्कमध्ये नव्याने तयार केलेल्या नसाउ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. पण सर्वांना उत्सुकता आहे ती 9 जूनला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याची..पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यानंतर 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडा विरुद्ध सामना होणार आहे.
Kohli & Jaiswal should open in the World Cup imo. Rohit & SKY should bat 3&4 depending on the start we get. Rohit plays spin really well so batting at 4 shouldn't be a concern. #T20WorldCup #INDvPAK #INDvIRE pic.twitter.com/nMgwwaDNXb
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 29, 2024
गेल्या 11 वर्षांपासून टीम इंडियाला आयसीसी चषक जिंकण्यात अपयश आलेलं आहे. शेवटची आयसीसी ट्रॉफी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकली होती. त्यानंतर बऱ्याच स्पर्धेत टीम इंडियाने सेमीफायनल, फायनल गाठली. पण यश काही मिळालं नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही टीम इंडियाला पराभवाचं सामना करावा लागला होता. भारताने टी20 वर्ल्डकप 2007 जिंकला होता. जवळपास 17 वर्षे टीम इंडिया टी20 वर्ल्डकपपासून वंचित आहे. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केलं होतं.