मुंबई : वनडे वर्ल्ड 2023 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून आयसीसीने वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत कोणता संघ जेतेपदाचा दावेदार ठरेल याबाबत आतापासूनच अंदाज बांधले जात आहे. भारतीय संघाकडून आयसीसी स्पर्धेत बऱ्याच अपेक्षा आहेत. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे. भारतात हा विश्वचषक होणार असल्याने टीम इंडियाला जेतेपदाचा दावेदार मानलं जात आहे. भारताने यापूर्वी 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला होता. 12 वर्षानंतर भारतीय भूमीत पुन्हा वर्ल्डकप होत आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने अंतिम फेरीत कोणते संघ पोहोचणार याचं भाकीत केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होईल असं त्याने सांगितलं आहे. तसेच 2011 वर्ल्डकपमधील काही गुपितं त्याने उघड केली आहेत.
स्टार स्पोर्ट्स या वृत्तवाहिनीवर बोलताना विरेंद्र सेहवागने खुलासा केला की, ‘2011 वर्ल्डकप दरम्यान धोनीचा फॉर्म हवा तसा चांगला नव्हता. पण भारतीय संघ सामने जिंकत होता. खिचडी खाल्ल्याने असं होत आहे असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याने खिचडी खाण्याचा अंधविश्वास कायम ठेवला. तो प्रत्येक सामन्यात खिचडी खायचा.’
‘प्रत्येकाचा काही ना काही अंधविश्वास असतो. प्रत्येक जण आपल्या अंधविश्वासाचं पालन कतो. एमएस धोनीला विश्वचषक स्पर्धेत खिचडी खाण्याचा अंधविश्वास होता. भले मी धावा करत नाही पण अंधविश्वास काम करत आहे. आपण प्रत्येक सामन्यात जिंकत आहोत.’, असं विरेंद्र सेहवाग याने पुढे सांगितलं.
वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका हे दोन संघ आमनसामने आले होते. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमवून 274 धावा केल्या आणि विजयासाठी 275 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 4 गडी गमवून 48.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात विरेंद्र सेहवाग शून्यावर बाद झाला होता.
सचिन तेंडुलकरने 14 चेंडूत 18 धावा, गौतम गंभीरने 122 चेंडूत 97 धावा, विराट कोहलीने 49 चेंडूत 35 धावा, तर महेंद्र सिंह धोनीने 79 चेंडूत नाबाद 91 धावांची खेळी केली होती. युवराज सिंगने 24 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या होत्या.