न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली आणि तिथे टीम इंडियाने बदलला प्रशिक्षक, नेमकं काय झालं जाणून घ्या

| Updated on: Oct 28, 2024 | 6:07 PM

भारताच्या तिन्ही फॉर्मेटसाठी राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहे. पण दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियात उलथापालथ झाली असून प्रशिक्षकपदाची धुरा या दिग्गज खेळाडूच्या खांद्यावर देण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिका दौरा होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली आणि तिथे टीम इंडियाने बदलला प्रशिक्षक, नेमकं काय झालं जाणून घ्या
Image Credit source: BCCI
Follow us on

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. चार सामन्यांची टी20 मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पण या मालिकेसाठी गौतम गंभीर ऐवजी बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मण याला प्रशिक्षक म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणसह साईराज बहुतुले, हृषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष कोचिंग स्टाफचा भाग असतील अशी माहिती देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी रवाना होणार आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी प्रशिक्षक गौतम गंभीर अनुपलब्ध असणार आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्याची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. लक्ष्मम एनसीएचा प्रमुख आहे. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत त्याने हंगामी प्रशिक्षक म्हणून यापूर्वी काम पाहिलं आहे. गौतम गंभीरची नियुक्ती होण्यापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण गेला होता.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला टी20 सामना 8 नोव्हेंबरला, दुसरा टी20 सामना 10 नोव्हेंबरला, तिसरा टी20 सामना 13 नोव्हेंबरला आणि चौथा टी20 सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. तर भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कशी कामगिरी करतो, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग , विजयकुमार वैशाख , आवेश खान , यश दयाल.