टीम इंडियाच्या माजी खेळाडूला डिवचणं महागात, मायकल वॉनला सडेतोड उत्तर

| Updated on: Aug 11, 2024 | 8:03 PM

Michael Vaughn Troll: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने नेहमीप्रमाणे टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉन यावेळेसही सोशल मीडियावर सर्वांसमोर तोंडावर आपटला.

टीम इंडियाच्या माजी खेळाडूला डिवचणं महागात, मायकल वॉनला सडेतोड उत्तर
Former England skipper Michael Vaughan
Image Credit source: ANI
Follow us on

टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत 0-2 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर यजमान श्रीलंकेने पुढील दोन्ही सामने जिंकले. टीम इंडियाने 27 वर्षांनंतर श्रीलंके विरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली. श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध 1997 साली अखेरीस द्विपक्षीय मालिका जिंकली होती. त्यानंतर आता श्रीलंकेला 27 वर्षांची प्रतिक्षा संपवण्यात यश आलं. तर भारताच्या या अशा कामगिरीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने टीम इंडियाला या पराभवावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफर याने वॉनला नेहमीप्रमाणे यंदाही तोंडावर पाडलंय.

मायकल वॉनने मालिका पराभवावरुन टीम इंडियाची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉन या प्रयत्नात तोंडघशी आपटला. वसीम जाफर एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #आस्कवसीम या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या प्रयत्नांना उत्तरं देत होता. वॉनने या संधीचा फायदा घेत जाफरला पर्यायाने टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या वनडे सीरिजमध्ये काय झालं होतं? आशा आहे की सर्वकाही चांगलं झालं असेल, असं वॉनने ‘एक्स’वर म्हटलं.

वॉर्नच्या एक्स पोस्टमध्ये काय?

“हाय वसीम! श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय मालिकेचा निकाल काय लागला? मी बाहेर असल्याने पाहू शकलो नाही. आशा आहे की सर्वकाही चांगलं असेल”, असं वॉनने वसीमला आपल्या एक्स पोस्टद्वारे प्रश्न करत डिवचलं. आता यावर वसीमने नेहमीप्रमाणे वॉनला चांगलंच उत्तरं दिलं. वसीमने उत्तर हे त्याच प्रकारे दिलं ज्या प्रकारने वॉनने प्रश्न केला.

“मी तुला अॅशेस सीरिजच्या उदाहरणाने तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. टीम इंडियाने श्रीलंके विरुद्धच्या मालिकेत तितके सामने जिंकले, जितके इंग्लंडने ऑस्ट्रेलियात जात गेल्या 12 वर्षात कसोटी सामने जिंकलेत”, असं जाफरने उत्तर दिलं. यानंतर वॉनला नेटकऱ्यांनीही चांगलाच ट्रोल केला आहे.

वसीम जाफरचं वॉर्नला जशास तसं उत्तर

इंग्लंडला 2011 पासून ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकण्यात यश आलेलं नाही. वसीमने हाच मुद्दा धरुन वॉनला सुनावलं. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 2011 साली सिडनीत डाव आणि 83 धावांच्या फरकाने हरवलं होतं. त्यानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात 15 सामने झाले आहेत. त्यापैकी 2 सामने हे अनिर्णित राहिले. तर उर्वरित 13 सामन्यात इंग्लंडला पराभूत व्हावं लागलंय.