मुंबई | भारतात यंदा 12 वर्षानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलंय. तसेच 5 सप्टेंबरपर्यंत एकूण 10 टीम आपल्या संघातील खेळाडूंची नावं जाहीर करणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र त्यापेक्षा जास्त लक्ष हे टीम इंडिया-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे लागलंय. त्या सामन्याबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मोठा निर्णय घेतलाय. “भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रकात बदल करण्याची मागणी एकूण 3 क्रिकेट बोर्डकडून आयसीसीला करण्यात आली आहे. पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. तसेच या मागण्यांबाबत येत्या 3-4 दिवसांमध्ये तोडगा काढला जाईल”, असं जय शाह म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
“तीन क्रिकेट बोर्डांकडून वेळापत्रकात बदल करण्याची लेखी मागणी आयसीसीकडे करण्यात आली आहे. मात्र तारीख आणि वेळेत बदल होईल, सामन्याचं ठिकाण तेच राहिल. वर्ल्ड कप स्पर्धेतील 2 सामन्यांमध्ये 5-6 दिवसांचं अंतर असल्यास ते 4-5 दिवसांचं करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत आयीसीसी 3-4 दिवसात निर्णय जाहीर करेल”, असं शाह म्हणाले.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. हा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्याच दरम्यान नवरात्री असणार आहे. या सामन्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर प्रेशर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्याच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचं चर्चा होती. त्यानुसार हा सामना 15 ऐवजी 14 ऑक्टोबरला खेळवण्याची चर्चा आहे. मात्र 14 ऑक्टोबरला आधीच 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे एकाच दिवशी 3 सामन्यांचं आयोजन करणं हे आव्हानात्मक असेल.
भारत-पाक सामन्याबाबत जय शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर शाह यांनी भारत-पाकिस्तान सामन्याचा उल्लेख न करता तेच उत्तर दिलं. “मी आधीच सांगितलंय की काही क्रिकेट बोर्डांनी आयसीसीला पत्राद्वारे मागणी केलीय. लवकरच निर्णय घेतला जाईल”, असा पुनरुच्चार शाह यांनी केला. सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काही चिंता आहे का, असा प्रश्न जय शाह यांना टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यावरुन करण्यात आला. “सुरक्षेचा मुद्दा अजिबात नाही”, असं शाह यांनी स्पष्ट केलं.
वर्ल्ड कप सामने स्टेडियममध्ये पाहायला येणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी आम्ही सल्ला घेतला आहे.अनेक स्टेडियमबाबत क्रिकेट चाहत्यांच्या तक्रारी असतात. भारतात एकूण 10 शहरांमधील स्टेडियमध्ये वर्ल्ड कप सामन्याचं आयोजन करण्यात आलंय.या 10 स्टेडियमना सोयीसुविधांबाबत कळवण्यात आलंय, असं शाह यांनी नमूद केलं.
“स्वच्छता, शौचालय आणि इतर सुविधा कशा चांगल्या देता येतील याकडे लक्ष केंद्रीत करत आहोत. तसेच अनेक स्टेडियम हे मेट्रोशी कनेक्ट आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मेट्रोने स्टेडियम गाठण्यासाठी प्रवृत्त करु”, असं शाह म्हणाले.
“स्टेडियमधील क्रिकेट चाहत्यांना मोफत पाणी देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही आयसीसी पार्टनरसोबत याबाबत चर्चा करु. मोफत पाण्याची बॉटल किंवा ग्लास देण्यात येईल”, असं जय शाह यांनी सांगितलं.