वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजेंड्स 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे करण्यात आलं आहे. यूनिस खान याच्याकडे पाकिस्तानचं नेतृत्व आहे. तर युवराज सिंह इंडिया चॅम्पियन्सचं नेतृत्व करत आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन यूनिसने बॅटिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॉलिंगसाठी भाग पाडलं आहे. ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी 12 जुलै रोजी सेमी फायनलमध्ये टॉस जिंकून इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं होतं. इंडियाने संधीचा फायदा घेत 250 पार मजल मारली. त्यामुळे युनिसने खबरदारी म्हणून टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
पाकिस्तानने उपांत्य फेरीत विंडिजवर 20 धावांनी मात करत फायनलमध्ये धडक मारली. तर त्यानंतर इंडियाने कांगारुंचा 86 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. आता हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत.याआधी साखळी फेरीत पाकिस्तानने इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे आता इंडियाकडे पाकिस्तानवर विजय मिळवत ट्रॉफी जिंकण्यासह गेल्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.
दरम्यान साखळी फेरीत पाकिस्तानने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला इंडियाची निराशाजनक कामगिरी राहिली, मात्र त्यानंतरही टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरली. इंडियाला 5 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले. साखळी फेरीत पाकिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि इंडिया चौथ्या स्थानी राहिली.
पाकिस्तान चॅम्पियन प्लेइंग ईलेव्हन: युनूस खान (कॅप्टन), कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, मिसबाह-उल-हक, आमेर यामीन, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ आणि सोहेल खान.
इंडिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युवराज सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), अंबाती रायुडू, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग, राहुल शुक्ला, अनुरीत सिंग