टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात एकमेव आणि अखेरच्या सराव सामन्यात बांगलादेशवर टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या एक दिवसआधी 60 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने बांगलादेशसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशला या विजयी धावांचा पाठलाग करताना 9 विकेट्स गमावून 122 धावांपर्यंतच पोहचता आलं. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. त्याआधी या सराव सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये नेहमीपेक्षा बदल पाहायला मिळाले. यशस्वी-शुबमनऐवजी संजू सॅमसन ओपनिंगला आला. तर ऋषभ पंत तिसऱ्या स्थानी बॅटिंगला आला. त्यामुळे टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मुख्य सामन्यातही अशीच असेल का? असा प्रश्न रोहितला सामन्यानंतर विचारण्यात आला. रोहितने यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच सामन्याबाबतही प्रतिक्रिया दिली.
“ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल खूप आनंद झाला आहे. खेळातून आम्हाला जे हवं होतं ते मिळालं. परिस्थितीचा उपयोग करुन घेणं महत्त्वाचं आहे”, असं रोहितने म्हटलं. तसेच या सामन्यात ऋषभ पंतने टीम इंडियासाठी सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. रोहितने याबाबत प्रतिक्रिया देताना बॅटिंग ऑर्डरवर भाष्य केलं. पंतला फक्त संधी देण्यासाठी तिसऱ्या स्थानी पाठवल्याचं रोहितने म्हटलं. तसेच “आम्ही अजून बॅटिंग ऑर्डर निश्चित केलेली नाही. आम्हाला बहुतेकांना मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. तसेच आमच्याकडे 15 खेळाडू आहेत. परिस्थितीनुसार सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची गरज आहे”, असं रोहितने स्पष्ट केलं.
दरम्यान टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात आयर्लंड विरुद्ध करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड हा सामना 5 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. आता आयर्लंड विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश प्लेईंग टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, साकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकिब आणि तन्वीर इस्लाम.