ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप संघ निवडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने स्पष्टच सांगितलं की, “आठव्या, नवव्या…”

| Updated on: Sep 05, 2023 | 2:12 PM

ODI World Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी निवडलेला संघच वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळणार आहे. फक्त दोन जणांना डावलण्यात आलं आहे. खेळाडूंची निवड करण्यामागे काय हेतू होता? याबाबत रोहित शर्मा याने स्पष्टच सांगितलं आहे.

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप संघ निवडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने स्पष्टच सांगितलं की, आठव्या, नवव्या...
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप संघात निवडलेल्या खेळाडूंबाबत रोहित शर्मा म्हणाला की...
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धा सुरु असताना वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कप स्पर्धेत निवडलेला जवळपास संघ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. मात्र या संघात आश्चर्य वाटेल अशा कोणतंच नाव नव्हतं. हा संघ निवडताना भविष्यात काय स्थिती असेल हा विचार करून निवड केल्याचं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. “काही जणांना संधी मिळाली नाही, मात्र असं दरवेळी खेळाडूंची निवड करताना होतं. त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. या स्थितीतून मी गेल्याने मला माहिती आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.

काय म्हणाला रोहित शर्मा?

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आठव्या नवव्या स्थानावर फलंदाजी करणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण या स्थानावर बरीच गणितं अवलंबून असतात. त्या दृष्टीने आम्ही संघ निवडताना विचार केला आहे. आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर फलंदाजी करून धावा करेल असे खेळाडू असणं गरजेचं आहे, असं रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत सांगितलं. “मी खासकरून गोलंदाजांना सांगितलं आहे की, आठव्या नवव्या स्थानावर फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी सामन्याचं चित्र पालटू शकते.”, असं रोहित शर्मा म्हणाला.

प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही

आशिया कप स्पर्धेत 17 जणांची टीम निवडली होती. वर्ल्डकपसाठी 15 जणांची टीम निवडली असून तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना स्थान मिळालं नाही. तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा सध्या आशिया कप स्पर्धेत आहेत. आशिया कप स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांना मुकलेल्या केएल राहुल याला संघात स्थान मिळालं आहे. तसेच सूर्यकुमार यादव याचीही संघात वर्णी लागली आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना गजविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या संघात होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव