आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात यजमान यूएसएने कॅनडावर घरच्या मैदानात कॅनडाचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली. कॅनडाने यूएसएला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. यूएसए हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 14 चेंडूआधी पूर्ण केलं. यूएसएने 17.4 ओव्हरमध्ये 3 बाद 197 धावा केल्या. एरान जोन्स हा यूएसएच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जोन्सने 10 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 94 धावांची विजयी खेळी केली. यूएसच्या विजयानंतर कॅप्टन मोनांक पटेल याने आपल्या ए ग्रुपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. मोनांक सामन्यानंतर काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी आहेत. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, कॅनडा, यूएसए आणि आयर्लंड हे 5 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. यूएसए आणि कॅनडा या संघांमध्ये ए ग्रुपमधून पहिला सामान झाला. यूएसएला कॅनडानंतर टीम इंडिया, पाकिस्तान आणि इतर संघांविरुद्ध खेळायचं आहे. यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल याने या महत्त्वाच्या सामन्याआधी थेट इशारा दिलाय.
“आमच्यासमोर कोणतीही टीम असोत, आम्ही त्याच पद्धतीने खेळणार, ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळत आलो आहोत. आम्ही आमच्या बेधडक-निर्भिड वृत्तीत कोणताही बदल करणार नाहीत, मग आमच्यासमोर टीम इंडिया असोत किंवा पाकिस्तान, त्याच्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही”, असं मोनांक पटेल याने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.
दरम्यान यूएसए आता आपले उर्वरित 3 सामने हे अनुक्रमे पाकिस्तान, टीम इंडिया आणि आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. यूएसएचा पुढील सामना हा 6 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यानंतर यूएससमोर 12 रोजी टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. तर 14 जून रोजी आयर्लंड विरुद्ध यूएसए अखेरचा साखळी फेरीतील सामना खेळणार आहे.
यूएसए प्लेईंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अली खान आणि सौरभ नेत्रवाळकर.
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत सिंग, निखिल दत्ता, डिलन हेलिगर, कलीम साना आणि जेरेमी गॉर्डन.