मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. स्पर्धेतील तीन टप्पे पूर्ण झाले असून कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती आहे. दिग्गज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. तर दक्षिण आफ्रिकेला दुबळ्या नेदरलँडने पराभूत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका सहज जिंकेल असं सांगितलं जात होतं. मात्र झालं भलंतच..हा सामना नेदरलँडने 38 धावांनी जिंकला. नेदरलँडने 43 षटकात 8 गडी गमवून 245 धावा केल्या. तसेच विजयासाठी 245 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ 207 धावांवर सर्वबाद झाला. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेवर 38 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.
नेदरलँडने पात्रता फेरीतही दिग्गज वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. तसेच दहा संघात स्थान मिळवत आता मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळे नेदरलँडचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. सर्वच स्तरातून नेदरलँडचं कौतुक होत आहे. असं असताना नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“आमच्या खेळाडूंवर मला अभिमान आहे. आम्ही या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या उद्देशानेच उतरलो आहोत. यासाठी आम्हाला दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघांना पराभूत करावं लागेल. आम्ही आज खूप चांगलं खेळलो. त्यामुळेच विजय सोपा झाला. पुढेही आम्हाला आणखी विजयाची अपेक्षा आहे.”, असं नेदरलँडचा कर्णधा स्कॉट एडवर्ड्स याने सांगितलं. या स्पर्धेत नेदरलँडचा सामना भारताशी सर्वात शेवटी 12 नोव्हेंबरला होणार आहे.
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.