मुंबई | भारताला 12 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. अखेरच्या वेळेस 2011 मध्ये भारतासह श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये संयुक्तरित्या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताची आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच पूर्णपणे आयोजन करण्याची पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याचा हा एकूण चौथा आणि भारतातील दुसरा वनडे वर्ल्ड कप असणार आहे. विराट पहिल्यांदाच 2011 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. आता विराटचा हा चौथा आणि शेवटचा वर्ल्ड कप असल्याचं म्हटलं जात आहे. विराटचा शेवटचा वर्ल्ड कप आहे का, असा प्रश्न त्याचा मित्र आणि विंडिजचा माजी क्रिकेटर ख्रिस गेल याला विचारण्यात आला. यावर ख्रिस गेल याने काय उत्तर दिलंय, हे आपण जाणून घेऊयात.
“मला नाही वाटत की विराट कोहली याचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल, तो आणखी एक वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकतो. विराटमध्ये आणखी एक वर्ल्ड कप खेळण्याची क्षमता आहे”, असा विश्वास व्यक्त करत ख्रिस गेल याने विराटच्या शेवटच्या वर्ल्ड कपबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला. गेलने एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केलं.
ख्रिस गेल याने विराट कोहली व्यतिरिक्त वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार कोण असेल, याबाबतची प्रतिक्रिया दिली. “टीम इंडिया कायमच प्रबळ दावेदार राहिली आहे. विशेष करुन टीम इंडिया जेव्हा आपल्या घरात खेळते तेव्हा ती दावेदारी आणखी वाढते. मात्र त्यामुळे टीमवर दबावही वाढतो. यावेळेस चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. “,असं ख्रिस गेल याने स्पष्ट केलं.
दरम्यान वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा आणि महाअंतिम सामन्याचं आयोजन हे गुजरातमधील अहमदाबाद शहरातील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा रंगणार आहे. तर टीम इंडिया 8 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.