टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी रंगला. या सामन्यातही भारताचं कर्णधारपद रोहित शर्मा आणि इंग्लंडचं कर्णधारपद जोस बटलरकडे होतं. त्यामुळे पुन्हा घडाळ्याची चक्र उलटी फिरून तसंच काहीसं घडत असल्याचं दिसत आहे. टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. पण नियतीच्या मनता काही वेगळंच होतं. इंग्लंडने भारताला 10 विकेट आणि 24 चेंडू राखून पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 168 धावा केल्या आणि विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केलं.
केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी ओपनिंगला उतरली होती. केएल राहुल 5 धावा करून ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण रोहित शर्मा 27 धावा करून बाद झाला. तर विराट कोहलीने 40 चेंडूत 50 धावा केल्या. सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही. 10 चेंडूत 14 धावांवर त्याचा खेळ आटोपला. हार्दिक पांड्याने यावेळी चांगली खेळी केलीय. 33 चेंडूत 63 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 5 षटकार मारले. ऋषभ पंत 6 धावांवर असताना रनआऊट झाला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने 2, अदिल राशिदने 1 आणि ख्रिस वोक्सने 1 विकेट घेतली.
जसप्रीत बुमराहची उणीव या सामन्यात प्रकर्षाने दिसून आली. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीकडे होती. पण त्यांना विकेट घेता आली नाही. जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी विजयी भागीदारी केली. जोस बटलरने नाबाद 80 आणि एलेक्श हेल्सने नाबाद 86 धावा करत टीमला जिंकवून दिलं. तसेच अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं.
आता भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. तारीख आणि ठिकाण वेगळं असलं तरी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना आहे. बरंच काही साम्य आहे. काही खेळाडू तेच आहेत. तर कर्णधाराच्या भूमिकेतही जोस बटलर आणि रोहित शर्मा आहे. त्यामुळे या उपांत्य फेरीत काय होते? याची उत्सुकता लागून आहे.