Explainer | राहुल द्रविड यांच्यासमोर दुसऱ्या कार्यकाळात काय आव्हान असणार?

| Updated on: Nov 29, 2023 | 8:35 PM

Team India Head Coach Rahul Dravid | राहुल द्रविड यांच्याकडे पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं देण्यात आली आहेत. वर्ल्ड कप संपताच त्यांचा कार्यकाळही संपला होता. मात्र आता बीसीसीआयने त्यांना मुदतवाढ दिली आहे. आता दुसऱ्या कार्यकाळात राहुल द्रविड यांच्यासमोर काय आव्हान असणार आहे?

Explainer | राहुल द्रविड यांच्यासमोर दुसऱ्या कार्यकाळात काय आव्हान असणार?
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 संपताच क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच प्रश्न चर्चेत होता तो म्हणजे टीम इंडियाचा पुढील हेड कोच असणार? बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर हे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेदरम्यान दिलं आहे. बीसीसीआयने हेड कोच म्हणून राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवला आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कपसह द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला होता. त्यामुळे पुढील हेड कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण याचं नाव चर्चेत होतं. मात्र बीसीसीआयने द्रविड एन्ड कंपनीवर विश्वास दाखवला आहे.

आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बीसीसीआयने हेड कोच आणि सपोर्ट स्टाफला मुदतवाढ दिल्याने आता आणखी काही महिने हे दिग्गज टीम इंडियासोबत असणार आहे. हा सपोर्ट स्टाफ टीम इंडियासह गेल्या 2 वर्षांपासून आहे. त्यामुळे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये चांगले नाते तयार झाले आहे, ज्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर अनुकूल परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. मात्र बीसीसीआयने या मुदतवाढीसह काही प्रश्नांची उत्तर दिलेली नाहीत, ज्यामुळे आता आणखी चर्चा रंगली आहे.

द्रविड कधीपर्यंत कोच म्हणून राहणार?

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सपोर्ट स्टाफला मुदतवाढ दिलीय. मात्र मुदतवाढ केव्हापर्यंत दिलीय हे त्यात स्पष्ट केलेलं नाही. बीसीसीआयने दिलेली मुदतवाढ 2 वर्षांसाठी असेल तर द्रविड एन्ड कंपनी 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत टीम इंडियासोबत असेल. मात्र काही दिवसांपूर्वी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी म्हटलेलं की टी 20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे अजून काहीही निश्चित नाही.

वेतन किती?

राहुल द्रविड यांना हेड कोच म्हणून पहिल्या कार्यकाळात 10 कोटी रुपये देण्यात येत होते. आता पुन्हा मुदतवाढ मिळाल्यानंतर मानधन किती मिळणार हे देखील निश्चित नाही. आता राहुल द्रविड यांचं वेतन वाढवण्यात आलंय की आहे तेवढेच अशीही चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार द्रविड यांना वेतन म्हणून 12 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मात्र ही चर्चाच आहे.

दुसऱ्या कार्यकाळातील आव्हानं

टीम इंडियाने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात द्विपक्षीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र एकाबाबतीत टीम इंडियाला अपयश आलं ते म्हणजे आयसीसी ट्रॉफी. द्रविड यांच्यात कार्यकाळात टीम इंडियाला 3 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी होती, मात्र त्यात यश आलं नाही. टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप 2022, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि नुकत्याच झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये अपयश आलं. डब्ल्यूटीसी फायनल आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियासाठी नासूर ठरली.

आता टीम इंडिया, टीम मॅनेजमेंट आणि खेळाडू सर्वकाही विसरून पुढे पाहत आहेत. अवघ्या काही महिन्यांवर टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा, चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि द्रविड एन्ड कंपनीचं या स्पर्धेच्या हिशोबाने जोरदार तयारी करण्याचं आव्हान असणार आहे.