आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्या. प्रत्येक संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला असून पाच संघांना विजय, तर पाच संघांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा देखील पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचा सामना होता. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियनच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला. शेवटच्या पाच षटकात जबरदस्त गोलंदाजी करून मुंबई इंडियन्सला पराभवाच्या दरीत ढकललं. गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 गडी गवून 168 धावा केल्या आणि विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमवून 162 धावा करता आल्या. तसेच 6 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मुंबई इंडियन्सला 30 चेंडूत 43 धावांची आवश्यकता होती. हातात 7 गडी शिल्लक असूनही 30 चेंडूत 6 गडी गमवून 36 धावा करता आल्या.या पराभवाचं विश्लेषण प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने करत आहे. पण काही जणांना हार्दिक पांड्याने पहिलं षटक टाकणंही रुचलेलं नाही. तसेच बुमराहचा वापरही व्यवस्थित केला नाही. आता यावर बॅटिंग कोच किरोन पोलार्डने स्पष्टीकरण दिलं आहे.
कर्णधार हार्दिकने आपल्या जुन्या संघाविरोधात पहिलं षटक टाकण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न विचारताच किरोन पोलार्ड म्हणाला, “तुम्हाला एक संघ म्हणून काय कारायचं याची योजना आणि निर्णय घेणं आवश्यक आहे. हार्दिक गेल्या काही वर्षांपासून गुजरातसाठी नव्या चेंडूने गोलंदाजी करतो. नवीन चेंडू स्विंग करण्याची हातोटी आहे. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे हा निर्णय काय नवीन नव्हता. नवीन चेंडू स्विंग होत असल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. मी जेव्हा या निर्णयाकडे पाहतो तेव्हा त्यात काहीच चुकीचं दिसत नाही. त्यामुळे आता यातून पुढे जायला हवं.”
पहिल्याच षटकात बाद झालेल्या इशान किशनचीही पाठराखण किरोन पोलार्डने केली. “तो आमच्या संघातील अनुभवी खेळाडू आहे. आम्हाला इशानकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तो योग्य जागेवर आहे. चांगला सराव करत आहे. त्यामुळे आशा आहे की, पुढच्या काही सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहू शकू. तुम्ही सर्वच त्याचं नंतर कौतुक कराल.”