“57 वर 5 विकेट्स असताना काय गरज होती…”, मुंबई इंडियन्सच्या पराभावनंतर इरफान पठाणने उपस्थित केला प्रश्न

| Updated on: May 04, 2024 | 1:20 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची स्थिती पाहून अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. एक काळ मुंबई इंडियन्सने गाजवला आहे. अशा मुंबई इंडियन्सची सध्याची स्थिती बघवत नाही. मैदानात बऱ्याच चुका होत असल्याचं अधोरेखित होत आहे. आता इरफान पठाणने प्रश्न उपस्थित केला आहे.

57 वर 5 विकेट्स असताना काय गरज होती..., मुंबई इंडियन्सच्या पराभावनंतर इरफान पठाणने उपस्थित केला प्रश्न
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या पदरी आणखी एक पराभव पडला आहे. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेची सुरुवात पराभवाने केली होती. यंदाच्या पर्वात सुरुवातील सलग तीन पराभव सहन केले. त्यानंतर कमबॅक करत तीन सामन्यात विजय मिळवला. मात्र त्यानंतर सलग पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. कोलकात्याविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सचा संघ 6 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. उर्वरित तीन सामन्यात जिंकूनही फारसा काही फायदा होणार नाही. त्यामुळे हे तीन सामने केवळ औपचारिक असतील. कारण नेट रनरेटमध्ये सुधारणा करणं खूपच कठीण आहे. असं असताना कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात सोपा विजय दिसत होता. मात्र तरीही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवानंतर इरफान पठाणने एक प्रश्न उपस्थित केला आहे. याचा संपूर्ण रोख हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीच्या दिशेने आहे असंच दिसतंय. इरफान पठाणने ट्वीट करत दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

“समालोचन करत असताना मी सामन्यादरम्यान एक प्रश्न उपस्थित केला होता. रमण धीरकडून गोलंदाजी करण्याचं कारण काय? जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने 57 वर 5 विकेट्स गमवले आहेत. का?”, असा प्रश्न विचारत इरफान पठाण अप्रत्यक्षरित्या हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित केला आहे. “वानखेडेवर इतका कमी स्कोअर असूनही कोलकात्याने काय विजय मिळवला.”, असं अभिनंदन करणारं ट्वीटही इरफान पठाणने केलं आहे.

दुसरीकडे श्रेयस अय्यरनेही हा विजय किती महत्त्वाचा होता हे अधोरेखित केलं आहे. “मी स्टार्कसोबत बोलत होतो. या सामन्याचं महत्त्व मी त्याला सांगितलं. हा सामना गमावला असता तर चार पैकी दोन जिंकणं आवश्यक होतं. पण हा विजय खूप मस्त होता. इम्पॅक्ट प्लेयर्समुळे या सामन्यात विजय सोपा झाला. मनिष पहिल्या दिवसापासून संधीच्या शोधात होता. आज त्याला ती संधी मिळाली. मला मुलांना एवढेच सांगायचे आहे की आम्ही आमच्या बॉलिंग लाइनअपने बचाव करू शकतो.”