मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कायम स्मरणात राहणारा आहे. या स्पर्धेत जय पराजयापेक्षा रनमशिन्स विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील वाद चर्चेत राहिला आहे. नवीन उल हक आणि विराट कोहली या वादाचं रुपांतर नंतर विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर असं झालं. मैदानातच दोन्ही खेळाडू भिडल्याचं सर्वांनी पाहिल. सोशल मीडियावर या भांडणाचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर नवीन उल हक आणि विराट कोहली यांचं क्रिप्टिक वॉरही पाहायला मिळालं. पण वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत अफगाणिस्तान सामन्यात या वादावर पडदा पडला. दोघांनी हातमिळवणी करून सर्वकाही संपुष्टात आल्याचं सांगितलं. आता या सर्व वादावर पडदा पडला असताना नवीन उल हकने या वादाची सुरुवात कुठून झाली हे सांगितलं आहे.
नवीन उल हकने झल्मी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मी माझ्या पूर्ण क्रिकेट करिअरमध्ये कधीच कोणाशी भांडण केलं नाही. मी कधीही भांडणाची सुरुवात करत नाही. पण जेव्हा समोरूनच वाद केला जातो तेव्हा मागेपुढे पाहात नाही. या भांडणाची सुरुवात विराट कोहलीकडून झाली होती.” या वादावर बोलल्यानंतर नवीन उल हकने विराट कोहलीची स्तुतीही केली.
नवीन उल हकने सांगितलं की, “आम्ही बंगळुरुमध्ये सामना खेळण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्ही सामना जिंकला. शेवटच्या चेंडूवर आम्हाला विजय मिळाला. या सामन्यात विजयी धाव घेतल्यानंतर उत्साहात आवेश खाने हेल्मेट जमिनीवर आपटलं. कदाचित हीच बाब विराट कोहलीला आवडली नाही. त्यानंतर त्यांची टीम लखनौला आली. मी शेवटच्या स्थानावर फलंदाजी करत होतो आणि आम्ही सामना गमावला. तेव्हा मला स्लेज केलं गेलं.”
“आम्ही सामना गमावला होता आणि पराभवानंतर स्लेज केलं जाईल याची अपेक्षा नव्हती. जेव्हा हे माझ्यासोबत घडलं तेव्हा मी स्वत:ला आवरू शकलो नाही. मीही त्याच भाषेत उत्तर दिलं. सामना संपल्यानंतर हातमिळवणीपर्यंत स्लेजिंग सुरु होती. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज स्लेजिंग करत होते.”, असंही नवीन उल हकने पुढे सांगितलं. पण आता वाद संपुष्टात आल्याचंही त्याने सांगितलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतच वादावर पडदा पडला आहे.