मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाची धूळ चाखल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी चषकासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षांतील आयसीसी चषकांचा दुष्काळ आही संपवता आला नाही. त्यामुळे आता 11व्या काही चमत्कार घडतो का? हे पाहणं गरजेचं आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी अवघ्या सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यात वरिष्ठ खेळाडू टी20 संघात खेळत नाहीत. त्यामुळे अंतिम 15 खेळाडूंची चमू कसा असेल याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेची धुरा कोणाकडे असेल? याबाबतही साशंकता आहे. टी20 संघाचा सूर्यकुमार यादव हा 11 वा कर्णधार आहे. म्हणजेच यापूर्वी 10 खेळाडूंनी टी20 संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. पण पहिल्याच मालिकेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी धुरा कोणाकडे सोपवावी? याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात आकडेवारीत कोण बेस्ट ठरतं ते…
रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वाने त्याने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करूनही जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी रोहित शर्मा याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. तेव्हा उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभूत केलं आणि स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाच नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिलं. त्यानंतर वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही अंतिम फेरीत तसंच घडलं आणि ऑस्ट्रेलियाने स्वप्नभंग केला. असं सर्व गणित असताना टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचं कर्णधारपद रोहितकडेच असावं असा एक मतप्रवाह आहे. पण तो ही जबाबदारी सांभाळणार की नाही? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
टी20 वर्ल्डकप 2022 नंतर हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपण्यात आलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत हार्दिक पांड्याने 16 सामन्यात भारताचं कर्णधारपद भूषवलं. 10 सामन्यात विजय, 5 सामन्यात पराभव, तर सामना ड्रॉ झाला. पण वारंवार दुखापतग्रस्त होत असल्याने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या मध्यात दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धा अर्धवट सोडली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका मालिकेसाठीही फीट नाही. त्यामुळे आता त्याच्याकडे पुन्हा टी20चं नेतृत्व सोपवायचं की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. दुसरीकडे हार्दिक पेक्षा सूर्यकुमार बरा अशीच काहिशी आकडेवारी आहे.
सूर्यकुमार यादव याने टी20 फॉर्मेटमध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित केलं आहे. वर्ष 2021 मध्ये सूर्यकुमार यादव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच नावलौकिक मिळवला. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारताने 4-1 ने विजय मिळवला. त्यामुळे हार्दिकपेक्षा सूर्याच बेस्ट कॅप्टन ठरेल अशी चर्चा रंगली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी टक्केवारी 65, तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात विजयी टक्केवारी 80 आहे. त्यामुळे आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी कर्णधारपदाची चुरस वाढली आहे यात शंका नाही.