टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या तीन जणांची जागा कोण भरून काढणार हा प्रश्न आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बॅटिंग शैली आणि रवींद्र जडेजाचा अष्टपैलू खेळ यामुळे यांची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एका जागेवर शुबमन गिल फिट बसतोय. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स नेतृत्व सांभाळल्यानंतर आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची निवड केली आहे. त्यामुळे टॉप ऑर्डरमधील उणीव गिलच्या माध्यमातून दूर होईल. तर दुसऱ्या नावासाठी बरेच पर्याय आहेत. यापैकी एक नाव अभिषेक शर्माचं आहे. 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला अभिषेक शर्मा त्याच्या आक्रमक स्ट्रोकप्लेसाठी नेहमीच प्रसिद्ध राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडसोबत भागीदारी करत अभिषेकने सनरायझर्स हैदराबादसाठी स्फोटक सुरुवात करून दिली आहे.
टी20 वर्ल्डकप संघात यशस्वी जयस्वालची निवड झाली होती. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जागा मिळाली नाही. पण जयस्वालमध्ये भविष्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक चांगली राहील. दुसरं, केएल राहुलही जागा घेऊ शकतो. 32 वर्षीय केएल राहुलने टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2022 वर्ल्डकप स्पर्धेचा अनुभव त्याच्या गाठिशी आहे. तसेच 2026 वर्ल्डकपमध्ये त्याचा अनुभव कामी येऊ शकतो.
ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन ही नावंही आघाडीवर आहे. दोघंही टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात.भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात ऋतुराज गायकवाड याचं नाव आहे. चांगल्या खेळीनंतर त्याचं संघातील स्थान नियमित होऊ शकतं. डावखुरा इशान किशनने टीम इंडियात ओपनिंग केली आहे. डावीउजवी बाजू सावरण्यासाठी इशान किशन चांगला पर्याय ठरेल.स्फोटक शॉट्ससह, किशन एक क्विकफायर स्टार्ट देऊ शकतो तर त्याची कीपिंगही जबरदस्त आहे. पण पंतची जागा घेणं वाटते तितकं सोपं नाही.
रवींद्र जडेजाची जागा भरून काढण्यासाठी अष्टपैलू छबी असलेला खेळाडू आवश्यक आहे. गरजेवेळी बॅटिंग आणि गोलंदाजीची धुराही सांभाळू शकेल. आता ही जागा कोण भरून काढते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 2026 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची बांधणी करताना या तीन जागांसाठी विचार करावा लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना आपल्या फॉर्मवर लक्ष केंद्रीत ठेवावं लागणार आहे.