मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कोरोनाच्या सावटाखाली आहे आणि त्यामुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, यापूर्वी हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता, परंतु आता हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोरोना संसर्ग आणखी पसरू नये म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या कॅम्पमध्ये पाच कोविड प्रकरणे आढळल्यानंतर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. दिल्ली कॅपिटल्सला कोविडची चिंता बाजूला सारून या सामन्यात चांगली कामगिरी करायची आहे आणि या हंगामातील तिसरा विजय त्यांच्या खात्यात टाकायचा आहे.
दिल्लीने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये दिल्लीने पराभव पत्करले आहेत. शेवटच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला होता. गुणतालिकेत हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पंजाबच्या कामगिरीकडे पाहिल्यास या संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. हा संघ त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने पंजाबचा पराभव केला होता. पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब दिल्लीच्या एका स्थान पुढे आहे.
या दोन संघांमधील आतापर्यंतच्या हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांनी आतापर्यंत 28 सामने खेळले आहेत. इतक्या सामन्यांपैकी पंजाबच्या वाट्याला 15 सामन्यात विजय मिळाला आहे, तर दिल्लीचा संघ 13 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, सध्याचा फॉर्म बघितला तर पंजाबचा संघ दिल्लीपेक्षा चांगल्या लयीत दिसत आहे.
या दोन संघांमधील गेल्या पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली तर दिल्लीचा संघ खूप पुढे आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये दिल्लीने चार तर पंजाबने केवळ एकच विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी 2 मे आणि 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला होता. 20 ऑक्टोबर 2020 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला होता. दिल्लीने 20 सप्टेंबर 2020 रोजी पंजाबचा पराभव केला होता. त्याचवेळी 20 एप्रिल 2019 रोजी झालेल्या सामन्यातदेखील दिल्लीने विजय नोंदवला होता.
इतर बातम्या
RR vs KKR IPL Match Result: अरेरे, KKR चा निसटता पराभव, चहलची गेम चेंजिंग ओव्हर