वर्ल्डकप 2011 फायनल सामन्यात युवराज सिंग याच्या आधी धोनी का आला? मुरलीधरन याने सांगितलं गुपित

| Updated on: Jun 28, 2023 | 6:32 PM

वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. या सामन्यात धोनीने युवराज सिंगच्या आधी येत फलंदाजी केली होती. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

वर्ल्डकप 2011 फायनल सामन्यात युवराज सिंग याच्या आधी धोनी का आला? मुरलीधरन याने सांगितलं गुपित
वर्ल्डकप 2011 अंतिम फेरीत धोनी याने युवराज सिंग याच्या आधी येण्याचा निर्णय का घेतला? मुरलीधरनने सांगितलं कारण
Follow us on

मुंबई : महेंद्रसिंग धोनी भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. आयसीसी स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चमकदार कामगिरी केली आहे. टी 20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली आहे. कॅप्टन कूल म्हणून ख्याती असलेला महेंद्रसिंह धोनी याने आपल्या निर्णयाने भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. टी 20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत शेवटचं षटक जोगिंदर शर्माकडे सोपवलं होतं. त्यानंतर वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत युवराज सिंगच्या आधी फलंदाजीला येण्याचा निर्णय महेंद्रसिंह धोनीने घेतला होता. 12 वर्षानंतर धोनीनं युवराज सिंगच्या आधी खेळण्याचा निर्णय का घेतला, याचं उत्तर मुथय्या मुरलीधरन याने दिलं आहे.

मुथय्या मुरलीधरन काय म्हणाला?

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन 2011 वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. तेव्हा त्याने धोनीच्या डोक्यात नेमकं काय सुरु असेल हे डिकोड करण्याचा प्रयत्न केला. मुरलीधरनने एका मुलाखतीत सांगितलं की, धोनी युवराज सिंगच्या आधी फलंदाजीला का आला असेल याला कारण आहे.

“युवराज सिंगचा रेकॉर्ड माझ्याविरुद्ध चांगला नव्हता. पण धोनी मला चांगल्याप्रकारे खेळायचा. आयपीएल नेट प्रॅक्टिसमध्ये त्याने माझ्या गोलंदाजीचा सामना केला होता. त्यामुळे त्याचा चांगला सराव झाला होता.”, असं मुथय्या मुरलीधरन याने सांगितलं. मुथय्या मुरलीधरन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता.

2011 वर्ल्डकप अंतिम फेरीत श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर 275 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली बाद झाले होते. 22 व्या षटकापर्यंत 114 धावांवर भारताने तीन महत्त्वाचे मोहरे गमावले होते. मुरलीधरन तेव्हा गोलंदाजी करत होता.

मुरलीधरन याने पुढे सांगितलं की, “धोनीने आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने वर खेळण्याचा निर्णय घेताल. पण त्यावेळी धोनीच्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं हे सांगणं कठीण आहे.पण धोनीचा तो निर्णय योग्य ठरला आणि भारताने जेतेपद जिंकलं.”

मुथय्या मुरलीधरन याने या सामन्यात एकूण 8 षटकं टाकत 39 धावा दिल्या होत्या. पण गडी बाद करण्यात यश आलं नव्हतं. तर महेंद्रसिंह धोनीने 79 चेंडूत नाबाद 91 धावांची खेळी केली. गौतम गंभीर 97 धावांवर बाद झाल्यानंतर युवराज सिंह फलंदाजीला आला आणि धोनीला साथ दिली. युवराज सिंगने 24 चेंडूत नाबाद 21 धावांची खेळी केली.