भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्या संघात असला तरी कर्णधारपदाची धुरा ही सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. रोहित शर्माने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून सूर्यकुमार यादवची निवड केली गेली आहे. खरं तर हार्दिक पांड्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपकर्णधार होता. त्ंयामुळे त्याच्याकडे कर्णधारपद येईल असं वाटत होतं. मात्र सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिक पांड्याला कर्णधारपद न मिळाल्याचं आशिष नेहराला जराही आश्चर्य वाटलं नाही. हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीने गुजरात टायटन्ससोबत दोन पर्व घालवली आहेत. त्यामुळे त्याला हार्दिक पांड्याबाबत बरंच काही माहिती आहे. या जोडीने एकदा जेतेपदाला आणि एकदा उपविजेतेपदापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आशिष नेहरा काय म्हणतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. नेहराने स्पोर्ट्स तकशी बोलताना याबाबत आपलं मत स्पष्ट केलं आहे.
‘यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. क्रिकेटमध्ये असं होत असतं. हार्दिक टी20 वर्ल्डकपमध्ये उपकर्णधार होता, त्यामुळे कदाचित आश्चर्य वाटू शकतं. पण नवीन प्रशिक्षकासोबत नवीन विचार समोर आला आहे. प्रत्येक कर्णधार आणि प्रशिक्षकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. काही दिवसांपूर्वीत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी फिटनेस असायला हवं हे स्पष्ट केलं होतं. हार्दिक जास्तीत जास्त एकाच फॉर्मेटमध्ये खेळत आहे. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये कमी खेळतो. हा निर्णय हार्दिक, कोणताही कर्णधार आणि प्रशिक्षकासाठी कठीण आहे. मी इतकं सांगू शकतो की वेगळा विचार आहे.’, असं गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितलं.
‘जेवढं टॅलेंट हार्दिककडे आहे, ते पाहता तो भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. हार्दिकने दोन षटकं टाको की नको. संघात चार वेगवान गोलंदाज असले तरी तो एक बॅलेन्स ठेवतो. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम नाही. व्हाईट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने होतात त्यामुळे हार्दिकला इंजरी होते असं नाही. ऋषभ पंत, केएल राहुल कर्णधार राहिलेत. पण जास्त सामने होत आहेत तर दुखापतग्रस्त तर होणारच ना..त्यामुळे बदल होईल. तुम्हाला असं पुढे पाहता येईल.’, असंही आशिष नेहरा पुढे म्हणाला.