आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला 24 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर मुंबईच्या प्लेऑफच्या सर्वच आशा धुळीस मिळाल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिग्गज खेळाडू असूनही पराभवाची मालिका सुरुच राहिली. हातातोंडाशी असलेला विजयाचा घास खाता आला नाही. यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स चांगलेच संतापलेले दिसत आहेत. ते आपला सर्व राग सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. अशात मुंबई इंडियन्सच्या रणनितीत बराच अभाव दिसून आला. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात तर रोहित शर्मा डगआऊटमध्ये बसला होता. त्याला इम्पॅक्ट सब्सिट्यूट म्हणून घेतलं होतं. त्यावरूनही प्रश्नांचा भडीमार होत आहे. कारण गोलंदाजीवेळी रणनिती ठरवताना रोहित शर्मा मैदानात नव्हता. त्यामुळे 57 धावांवर 5 विकेट असूनही कोलकाता नाईट रायडर्सने 170 धावांपर्यंत मजल मारली. मात्र रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर्स निवडण्यामागे कारण होतं. याबाबत फिरकीपटू पियुष चावलाने खुलासा केला आहे. पियुष चावलाने सांगितलं की, रोहित शर्माच्या पाठीत दुखापत होती म्हणून त्याला प्लेइंग 11 मध्ये सहभागी केलं नाही.
कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला होता. त्याने 12 चेंडूत 11 धावा केल्या आणि बाद झाला. चावलाने सांगितलं की, “रोहित शर्माच्या पाठीत थोडी दुखापत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवडलं. आम्ही आत्मसन्मानासाठी मैदानात उतरलो होतो. आपण क्वॉलिफाय होऊ की नाही ते ठरवून उतरत नाहीत. प्रत्येक जण नावासाठी खेळतो. आम्हीही त्यासाठीच खेळतो. सर्वांनाच माहिती आहे की, टी20 हा लय असलेला खेळ आहे. आम्हाला या स्पर्धेत सूर गवसला नाही. ये कोणत्याही संघासोबत होऊ शकतं. असं आमच्यासोबत पहिल्यांदा झालं नाही. कोणत्याही संघासोबत होऊ शकतं.”
आयपीएल स्पर्धेत पियुष चावलाने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ड्वेन ब्रावो मागे टाकत 35 वर्षीय पियुष चावला सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. पियुष चावला आतापर्यंत 184 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने याबाबत बोलताना सांगितलं की, “आयपीएल 17 वर्षापूर्वी सुरु झालं होतं. तेव्हा फिरकीपटूंना प्राधान्य दिलं जात नव्हतं. पण भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पाहिली तर त्यात अश्विन, चहल आणि मी सहभागी आहे. सर्वच फिरकीपटू आहेत. ही एक चांगली बाब आहे.”