बार्बाडोस | कसोटी मालिकेत चितपट केल्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकला. टीम इंडियाने फिल्डिंगचा निर्णय घेत विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवला. बॅटिंगसाठी आलेल्या विंडिजला हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकुर या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेत टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात करुन दिली. या चांगल्या सुरुवातीचा फायदा रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने घेतला.
जडेजा-यादव या फिरकी जोडीने विंडिजच्या फलंदाजांना नाचवलं. या दोघांनी विंडिजच्या फलंदाजांना बॉलिंगमधून बांधून ठेवलं. या जोडीने विंडिजच्या शेवटच्या 7 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव याने 4 तर रविंद्र जडेजा याने 3 विकेट्स घेतल्या. विंडिजचा बाजार अवघ्या 23 ओव्हरमध्ये 114 वर गुंडाळल्याने टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांचं आव्हान मिळालं.
टीम इंडिया हे विजयी आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण करेल, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र झालं उलटच. ओपनिंगसाठी रोहित शर्मा स्वत: न येता ईशान किशन आणि शुबमन गिल या दोघांना पाठवलं. त्यामुळे किकेट चाहत्यांना झटका लागला. या 115 धावांसाठी विंडिजने टीम इंडियाला चांगलंच झुंजवलं. इतकंच नाही, तर टीम इंडियाला हे विजयी आव्हान पूर्ण करण्यासाठी 5 विकेट्स गमवावे लागले.
शुबमन गिल 7, हार्दिक पंड्या 5 आणि शार्दुल ठाकूर याने 1 अशी खेळी केली. सू्र्यकुमार यादव 19 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन रोहितने स्वत: ओपनिंगला न येता बदलाचे प्रयोग करुन पाहिले, जे यशस्वी ठरले नाहीत. एका बाजूला झटपट विकेट्स जात होते. तर दुसरी बाजू ईशानने लावून धरली होती. ठराविक अंतराने विकेट गमावल्याने रोहितला मैदानात यावं लागलं. टीम इंडियाने 22.5 ओव्हरमध्ये 118 धावा केल्या. मात्र त्यासाठी 5 विकेट्स गमवाव्या लागल्या. ईशान किशन याने नाबाद 52, रोहित शर्मा 12, आणि रविंद्र जडेजा याने 16* धावांचं योगदान दिलं.
मात्र वर्ल्ड कप आणि आशिया कप स्पर्धेच्या तोंडावर फक्त 116 धावा पू्ण करण्यासाठी 5 विकेट्स गमवावं लागणं ही टीम इंडियासाठी चिंताजनक बाब आहे. बॅटिंग ऑर्डर बदलल्याने टीम इंडियाचा अर्धा संघ हा माघारी परतला. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा हा प्रयोग शंभर टक्के फसलाच. तसेच टॉप ऑर्डरमध्ये बदल झाल्यामुळे खेळाडू गडबडल्याने टीम इंडिया उघडी पडली. एकदिवसीय मालिकांकडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रंगती तालीम म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे 115 धावांसाठी टीम इंडियाने 5 विकेट्स गमावल्याने मोठा मॅटरचा विषय झालाय.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.