गयाना | टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यातही माती खाल्लीय. विंडिजने टीम इंडियावर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विंडिजला विजयसाठी 153 धावांचे आव्हान दिले होते. विंडिजने हे आव्हान 18.5 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. वेस्ट इंडिज संघाकडून निकोलस पूरन याने सर्वाधिक 67 धावा केल्या.
टीम इंडियाकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. तिलकने 41 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्मा याचं पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरलं. ईशान किशन याने 23 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिकने 24 धावा जोडल्या. अक्षर पटेल 14 रन्स करुन माघारी परतला. रवि बिश्नोई याने 8 आणि अर्शदीप सिंह याने नाबाद 6 धावा केल्या.
वेस्ट इंडिज संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, संघाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट्स गेल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्याच बॉलवर ब्रेंडन किंग याला शून्यावर पाठवलं. त्यापाठोपाठ जॉनसन चार्ल्सही आऊट झाला. टीम इंडिया सामन्यामध्ये पकड मिळवणार असं वाटत होतं, मात्र निकोलस पूरन याने आपल्या तोडफोड फलंदाजीने सामना विंडिजच्या बाजूने झुकवला होता. पूरन याने 40 बॉलमध्ये 67 धावा केल्या होत्या मात्र मुकेश कुमारने त्याला आऊट करत सामना झुकवला.
126 वर 4 विकेट्स असणाऱ्या विंडिजची अवस्था 129 वर 8 अशी झाली होती. मात्र अकील होसैन आणि अल्जारी जोसेफ यांनी संघाला विजय मिळवून दिला. आता 5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने 2-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. नाहीतर मालिका गमवावी लागू शकते.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.