मुंबई | टीम इंडियाकडून खेळणं हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी असंख्य युवा खेळाडू रात्रंदिवस जीव तोडून सराव करतात. आयपीएलमुळे क्रिकेटपटूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. इतकंच नाही पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. आयपीएलच्या माध्यमातून अनेकांचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. आयपीएलमध्ये छाप सोडून अनेकांनी टीम इंडियात स्थान मिळवलंय. अशाच एका युवा फलंदाजाने आयपीएल 16 व्या मोसमात धमाका केला. आता या खेळाडूची विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत निवड निश्चित मानली जात आहे.
आयपीएलच्या 16 व्या पर्वात प्रतिस्पर्ध्यांना बॅटिंगने घाम फोडणाऱ्या रिंकू सिंह याची 38 दिवसांनंतर स्वप्नपूर्ती होऊ शकते. रिंकूने टीम इंडियाच्या जर्सीत खेळण्याचं स्वप्न पाहिलेलं. हे स्वप्न विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेनिमित्ताने पूर्ण होऊ शकतं. रिंकूने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना शानदार कामगिरी केली होती. रिंकूने या कामगिरीच्या जोरावरच टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला होता. आता काही दिवसात रिंकूसाठी टीम इंडियाचे द्वार खुले होणार असल्याचं समजतंय.
टीम इंडिया विंडिज दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. 2 सामन्यांची कसोटी, 3 सामन्यांची वनडे आणि 5 सामन्यांची टी 20 मालिका असणार आहे. यापैकी कसोटी आणि वनडे सीरिजासाठी भारतीय संघ जाहीर झालाय. तर टी 20 मालिकेसाठी काही दिवसांनी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. या टी 20 मालिकेसाठी रिंकूची निवड केली जाऊ शकते. रिंकूने यासाठी तयारीही सुरु केलीय.
टीओआयनुसार, रिंकू विंडिज दौऱ्यात पदार्पण करु शकतो. रिंकूने आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 149.52 च्या स्ट्राईक रेट आणि 59.24 च्या एव्हरेजने 474 धावा केल्या.
प्रत्येक क्रिकेटरच्या कारकीर्दीत एक असा क्षण येतो जिथे तो हिरो होतो. रिंकूच्या कारकीर्दीत हाच क्षण आयपीएल 16 व्या मोसमात आला. रिंकूने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात एकहाती मॅच फिरवली. केकेआरला विजयासाठी 5 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. तेव्हा रिंकूने यश दयाल याच्या बॉलिंगवर सलग 5 सिक्स ठोकून केकेआरला जिंकवलं.