त्रिनिदाद | टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने खेळवण्यात आले आहेत. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी पोर्ट ऑफ स्पेनमधील क्विन्स पार्क ओव्हल इथे खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने विजयी सलामी दिली होती. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विंडिजवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तर दुसरा सामना जिंकून विंडिजने बरोबरी साधली होती. त्यामुळे तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या सर्व गडबडीदरम्यान टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी
आली आहे.
टीम इंडियाची विंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. विंडिजने टीम इंडियाला 2006 मध्ये एकदिवसीय मालिकेत 3-1 ने पराभूत केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाने सातत्याने विंडिजवर वनडे सीरिजमध्ये विजय मिळवलाय. मात्र आता मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियावर तब्बल 17 वर्षांनी वनडे सीरिज गमावण्याची टांगती तलवार आहे.
टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली हा टीम इंडियासोबत तिसऱ्या मॅचसाठी प्रवास केलं नसल्याचं समजतंय. त्यामुळे विराटला तिसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झालीय.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हार्दिक पंड्या याला कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली. तर संजू सॅमसन याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र इथे हा प्रयोग फसला. विंडिजने टीम इंडियावर विजय मिळवला. त्यामुळे आता तिसरी मॅच ही निर्णायक स्थितीत आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली सोबत नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर विराट कोहली तिसऱ्या सामन्यात सहभागी होणार नसेल, तर टीम इंडियासाठी निश्चितच चिंताजनक बाब असेल.
दरम्यान या एकदिवसीय मालिकेनंतर विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका पार पडणार आहे. या मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 13 ऑगस्ट रोजी 5 वी आणि अंतिम मॅच खेळवण्यात येईल.