मुंबई | भारताला 12 वर्षानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. भारतात 2011 नंतर यंदा 2023 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयसीसीने 9 ऑगस्ट रोजी वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा आणि अंतिम सामना हा गुजरात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडिया सध्या विंडिज दौऱ्यात टी 20 मालिका खेळत आहे.
तिलक वर्मा याने विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय डेब्यू केलं. या 20 वर्षीय फलंदाजाने चमकदार कामगिरी करत आपली छाप सोडली. तिलक वर्मा याच्या कामगिरीची दखल टीम इंडियाचे माजी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी वक्तव्य केलं आहे.
एमएसके प्रसाद यांच्यानुसार, तिलक वर्मा हा वनडे क्रिकेटसाठी सक्षम आहे. “तिलक वर्मा याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये हैदराबादसाठी केलेली कामगिरी बघा. त्याचा 25 सामन्यांमध्ये एव्हरेज हा 55 इतका आहे. तिलकने या दरम्यान 5 शतकं आणि 5 अर्धशतकं ठोकली आहेत. याचाच अर्थ असा की तिलक अर्धशतकाचं रुपांतर शतकात करतो. त्याचा स्ट्राईक रेट 100 इतका आहे.”
“जर श्रेयस अय्यर दुर्देवाने टीममध्ये कमबॅक करण्यात अपयशी ठरला तर त्यासाठी तिलक वर्मा हा सर्वोत्तम पर्याय असेल. तिलकबाबत विचार करु शकतो. पण मला विश्वास आहे की तिलक भविष्यात वनडे फॉर्मेटसाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास येईल”, असा विश्वास एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला. तिलकने विंडिज विरुद्धच्या पहिल्या 3 टी 20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 39, 50 आणि 49* धावा केल्या आहेत.
दरम्यान टीम इंडियाकडून डेब्यू करणाऱ्या तिलक वर्मा याने आयपीएल 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून तडाखेदार कामगिरी केली. तिलकने मुंबईसाठी निर्णायक क्षणी संकटमोचकाची भूमिका बजावली. तसेच गरजेच्या वेळेस फटकेबाजी करत मुंबईला विजय मिळवून देण्यात योगदान दिलं.
तिलक वर्मा याने आयपीएल 16 व्या हंगमात 11 सामन्यांमध्ये 42.88 च्या सरासरीने 343 धावा केल्या. तिलकने या दरम्यान एकमेव अर्धशतक ठोकलं. तर याआधी 15 व्या सिजनमध्ये तिलकने 397 धावा केल्या होत्या.