निवृत्ती घेणं हास्यास्पद..! टी20 फॉर्मेटमधून रिटायर झालेल्या रोहित शर्माच आश्चर्यकारक विधान, यू-टर्नबाबत म्हणाला…

| Updated on: Sep 18, 2024 | 4:04 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीबाबत स्पष्ट विधान केलं आहे. आजकाल निवृत्ती घेणं हास्यास्पद झाल्याचं मत रोहित शर्माने व्यक्त केलं आहे. रिटायरमेंटनंतर पुन्हा क्रिकेट खेळताना खेळाडू दिसत असल्याचं त्याने सांगितलं आहे. तर पुन्हा टी20 मध्ये कमबॅकबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.

निवृत्ती घेणं हास्यास्पद..! टी20 फॉर्मेटमधून रिटायर झालेल्या रोहित शर्माच आश्चर्यकारक विधान, यू-टर्नबाबत म्हणाला...
Image Credit source: PTI
Follow us on

भारत बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने रिटायरमेंटबाबत मोठं विधान केलं आहे. टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच वनडे आणि कसोटी सामने खेळताना दिसणरा आहे. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही या फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. पण टी20 क्रिकेट हे रोहितच्या नसानसात भिनलेलं आहे. हा त्याच्या आवडीचा फॉर्मेट असून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे पत्रकार त्याला वारंवार या फॉर्मेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न विचारतात. त्यावर रोहित शर्माने स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. रोहित शर्माने जिओ सिनेमाशी बोलताना याबाबत आपलं मत जाहीर केलं आहे.

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘जागतिक क्रिकेटमध्ये आजकाल निवृत्ती हास्यास्पद झाली आहे. खेळाडू निवृत्ती जाहीर करतात आणि पुन्हा क्रिकेट खेळताना दिसतात. असं भारतात झालं नाही. भारतात असं क्वचितच पाहायला मिळतं. पण अन्य देशांच्या खेळाडूंना पाहतो. ते आधी निवृत्ती घेतात आणि नंतर यूटर्न घेतात. त्यामुळे तु्म्हाला कळत नाही की खेळाडूने निवृत्ती घेतली आहे की नाही. पण माझा निर्णय शेवटचा आहे आणि जे काही आहे ते स्पष्ट आहे. जो फॉर्मेट मला सर्वात जास्त आवडतो. त्याला रामराम ठोकण्याची ही योग्य वेळ होती.’

रोहित शर्माने जवळपास 17 वर्षे टी20 क्रिकेट खेळलं. दोन्ही टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला आहे. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात, तर 2024 मध्ये नेतृत्व करत जेतेपद मिळवलं आहे. रोहित शर्माने आतापर्यंत टीम इंडियासाठी 159 टी20 सामने खेळले आहेत. यात पाच शतकं आणि 4231 धावा केल्या आहेत. तसेच रोहित शर्माच्या नावावर 32 अर्धशतकंही आहेत.

दरम्यान, रोहित शर्मा आता वनडे आणि कसोटी सामने खेळताना दिसणार आहे. रोहितच्या दृष्टीक्षेपात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे.