न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या पराभवाच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला बरोबर आपल्या जाळ्यात गोवलं आहे. दुसऱ्या कसोटीत कमबॅक करणार अशी आरोळी देणाऱ्या खेळाडूंचा एका अर्थाने पचका झाल्याचं दिसत आहे. सामना अजून संपला नसला तरी आता अंदाज तसाच बांधला जात आहे. न्यूझीलंडच्या हातात अजून 5 विकेट शिल्लक असून शनिवारी 400 धावांचा पल्ला गाठेल असं दिसत आहे. त्यामुळे 400 धावांचं मोठं आव्हान गाठणं वाटतं तितकं सोपं नसेल. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाचं तोंड बघावं लागणार अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये आहे. या पराभवासह भारतीय संघ मालिका गमावेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणितही फिस्कटणार आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 12 सामन्यानंतर भारताची विजयी टक्केवारी 68.06 टक्के इतकी आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, तर श्रीलंका 55.56 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणार असं वाटत होतं. पण बंगळुरूतील पराभव आणि पुण्यात पराभवाचं सावट पाहता आता अंतिम फेरी गाठणं आव्हानात्मक असणार आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना गमवला तर विजयी टक्केवारी 68.06 वरून 62.82 वर येऊन ठेपेल. त्यामुळे पुढचं गणित खूपच किचकट होणार आहे. त्यात भारताचे आता एकूण सहा सामने शिल्लक आहेत. त्यापैकी पाच सामने हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत.
भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी आता उर्वरित सहा पैकी चार सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यात न्यूझीलंडविरुद्ध एक सामना शिल्लक आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामने आहेत. चार सामन्यात विजयाचं समीकरण हे इतर संघांच्या कामगिरीवर विना अवलंबून असणार आहे. जर चार सामने जिंकता आले नाहीत तर मात्र इतर संघाच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागेल. श्रीलंका वर्ल्ड टेस्ट सायकलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेशी खेळणार आहे. या मालिकेवर भारताचं अंतिम फेरीचं गणित ठरेल.
भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली तर अंतिम फेरीसाठी दक्षिण अफ्रिकेचं गणित सुटू शकतं. कारण दक्षिण अफ्रिकेला अजून पाच सामने खेळायचे आहेत. त्यापैकी चार सामने हे आपल्याच देशात श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहेत. त्यामुळे या चार सामन्यात विजयाचं गणित दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने झुकलेलं आहे.