टी20 वर्ल्डकप स्पर्धेत फिरकीपटू कुलदीप यादव याने मोलाची भूमिका बजावली. सुपर 8 फेरीत रोहित शर्माने सिराजऐवजी त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये वर्णी लावली. या संधीचं त्याने सोनं केलं. तसेच टीम इंडियाला महत्वाच्या सामन्यात विकेट मिळवून दिल्या. खासकरून इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याच्या फिरकीची जादू दिसून आली. 4 षटकात 19 धावा देत 3 महत्त्वाचे गडी बाद केले. अंतिम फेरीत फिरकीला मदत करणारी विकेट नसल्याने त्याला यश मिळालं नाही. असं असलं तरी इथपर्यंत पोहोचवण्यात त्याचाही हातभार होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरून टीम इंडियाने 11 वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर केला. यापूर्वी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये आयसीसी चषक जिंकला होता. त्यामुळे हा विजय खूपच महत्त्वाचा होता. या विजयानंतर कुलदीप यादवने मुलाखत दिली. यात त्याने आपल्या लग्नाबाबत खुलासा केला.
कुलदीप यादवच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाची फिकीर गेल्या काही दिवसांपासून आहे. अनेकदा त्याचे चाहते सोशल मीडियावर व्यक्तही झाले आहेत. आता कुलदीप यादवने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यात त्याने आपल्या लग्नबाबत खुलासा केला आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. “तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी मिळेल. पण ती अभिनेत्री नसेल हे मात्र स्पष्ट आहे. तिने माझी आणि माझ्या कुटुंबियांची काळजी घ्यावी हे महत्त्वाचं आहे.”, असं कुलदीप यादवने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कुलदीप यादव एकूण 5 सामने खेळला आणि त्यात त्याने 10 विकेट्स घेतल्या. सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला स्पेल टाकला. यात त्याने 14 धावा देत 2 गडी बाद केले. इंग्लंडविरुद्धही त्याची खेळी सर्वोत्तम ठरली. कुलदीप यादवने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 12 कसोटी, 103 वनडे आणि 40 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटी 53, वनडेत 168 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 69 विकेट्स घेतल्या आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यात कुलदीप यादवला आराम देण्यात आला आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात त्याचा विचार केला जाऊ शकतो. टीम इंडिया जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी20 सामने आणि 3 वनडे सामने खेळणार आहे.