स्मृती मानधना हीच्या नेतृत्वात वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने नववर्षात धमाकेदार सुरुवात केली. महिला ब्रिगेडने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात आयर्लंडवर 15 जानेवारी रोजी 304 धावांच्या ऐतिहासिक फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात विक्रमी 435 धावा केल्या. त्यानतंर आयर्लंडला 131 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच पाहुण्या आयर्लंडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं. टीम इंडियाने या सामन्यातील विजयासह अनेक विक्रम केले.
महिला ब्रिगेडने राजकोटमध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात 5 विकेट्स गमावून 435 धावा केल्या. टीम इंडियाची वनडे क्रिकेटमधील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. टीम इंडियाची 400 पार मजल मारण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
आयर्लंडला 436 धावांच्या प्रत्युत्तरात 131 धावाच करता आल्या. टीम इंडियाने यासह हा सामना 300 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने जिंकला. टीम इंडियाने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. धावांबाबत हा महिला क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला.
कर्णधार स्मृती मानधना हीने 70 चेंडूत शतक झळकावलं. तसेच स्मृतीने एकूण 80 चेंडूत 135 धावांची खेळी केली. स्मृतीने यासह कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा वेगवान शतकाचा रेकॉर्ड ब्रेक केला. हरमनप्रीतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 बॉलमध्ये शतक केलं होतं.
तसेच प्रतिका रावल हीने आयर्लंडविरुद्ध 129 बॉलमध्ये 154 रन्स केल्या. प्रतिका यासह टीम इंडियाकडून 150 पेक्षा अधिक धावा करणारी तिसरी महिला फलंदाज ठरली. त्याआधी दीप्ती शर्मा 188 तर हरमनप्रीत कौर हीन ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171 धावा केल्या होत्या.
स्मृती आणि प्रतिका या जोडीने 233 धावांची सलामी भागीदारी केली. या जोडीने यासह टीम इंडियासाठी तिसरी सर्वात मोठी भागीदारी केली. त्याआधी 2017 साली दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघींनी 2017 साली 320 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
स्मृतीने या शतकी खेळीत एकूण 7 सिक्स ठोकले. स्मृतीने यासह हरमनप्रीत हीच्या एका डावातील सर्वाधिक 7 षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली. हरमनने 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 171 धावांच्या खेळीत 7 सिक्स लगावले होते.
तसेच महिला क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक 9 सिक्सचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर झाला. स्मृतीने 7 सिक्स लगावले. तर प्रतिका रावल आणि ऋचा घोष या दोघींनी प्रत्येकी 1-1 सिक्स लगावला. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने 2024 मध्ये बंगळुरुतील सामन्यात 8 सिक्स लगावले होते.
तसेच टीम इंडिया 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लिन स्वीप करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 33 वेळा क्लीन स्वीपने विजय मिळवलाय. टीम इंडियाने या यादीत इंग्लंडला मागे टाकलं. टीम इंडियाची क्लीन स्वीपने विजयी होण्याची ही 13 वी वेळ ठरलीय. तर इंग्लंडने 12 वेळा हा कारनामा केला आहे.