वूमन्स क्रिकेट टीम इंडिया सध्या मायदेशात विंडिज विरुद्ध टी 20I मालिका खेळत आहे. उभयसंघातील एकूण 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना चुरशीचा होणार इतकं निश्चित आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडिजचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात 1-0 ने आघाडी घेतली. मात्र मंगळवारी 17 डिसेंबरला विंडिजने पलटवार केला. विंडिजने करो या मरो सामन्यात टीम इंडियावर 9 विकेट्सने विजय मिळवला. विंडिजने या विजयासह पहिल्या पराभवाचा वचपा घेतला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्यात यश मिळवलं.
त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची दोन्ही संघाना समसमान संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. टीम इंडियासाठी पहिल्या दोन्ही सामन्यात कर्णधार स्मृती मंधाना हीने अर्धशतकी खेळी केली. मात्र काहींचा अपवाद वगळता इतर सर्वच फलंदाज अपयशी ठरत आहे. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर भारतीय खेळाडूंना फलंदाजीच चमक दाखवावी लागणार आहे.
दरम्यान उभयसंघातील तिसरा सामना हा गुरुवारी 19 डिसेंबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), नंदिनी कश्यप, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजना सजीवन, रघवी बिस्त, रेणुका सिंह ठाकूर, प्रिया मिश्रा, तीतस साधू, सायमा ठाकोर, मिन्नू मणी आणि राधा यादव.
टी 20i मालिकेसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलिया एलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झायदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.