मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिला सामना 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. आताच वुमन्स आयपीएलचा लिलाव पार पडला असून 4 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. सर्व संघांनी आपल्या कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आपल्या संघाचं कर्णधारपद लिलावातील सर्वात महागडी ठरलेल्या स्मृती मंधानाकडे सोपवलं आहे. अशातच भारतीय संघाचा खेळाडू के. एल. राहुलच्या लखनऊ संघानेही महिला संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
यूपी वॉरिअर्स संघाने ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिसा हिलीकडे नेतृत्त्वपदाची धुरा सोपवली आहे. एलिसा हिली यष्टीरक्षक असून फलंदाजी करते. महिला क्रिकेटमधील एलिसा हिली सर्वात लोकप्रिय चेहरा असून अनुभवाचीही तिच्याकडे काही कमी नाही. मी पहिल्यांदा होणाऱ्या वुमन्स आयपीएल लीग स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली याचा मला अभिमान आहे. आमचा संघ संतुलित असून ही स्पर्धा जिंकण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न करू, असं एलिसा हिलीने सांगितलं आहे.
यूपी वॉरिअर्सने एलिसाला 70 लाखांमध्ये लिलावात आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूपी वॉरिअर्सने दीप्ती शर्मासाठी 2.6 कोटी खर्च केले होते. त्यामुळे सर्वांना वाटत होतं की संघाचं कर्णधारपद दीप्तीकडे जाईल मात्र संघ व्यवस्थापनाने एलिसाकडे नेतृत्त्व दिलंय.
ऑस्ट्रेलियासाठी एलिसाने पाच T-20 विश्वचषक (2010, 2012, 2014, 2018 आणि 2020) आणि 1 विश्वचषक (2022) जिंकले आहेत. 139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 127.72 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने एकूण 2446 धावा केल्या आहेत. 94 एकदिवसीय सामने खेळले असून 2639 धावा केल्या आहेत. यामध्ये तिने 5 शतके आणि 15 अर्धशतके मारली आहेत.
एलिसा हिली (C), सोफिया एसेल्टन, दीप्ती शर्मा, ताहिला मगरा, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, प्रश्वी चोप्रा, स्वेता सेहरावत, एस यशरी, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, लक्ष्मी यादव.