Asia Cup 2024 : श्रीलंकेने थायलंडला पाजलं पराभवाचं पाणी, 10 गडी राखून मिळवला विजय

| Updated on: Jul 24, 2024 | 9:31 PM

आशिया कप स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध थायलंड सामना रंगला. या सामन्यात श्रीलंकेने थायलंडचा 10 विकेट्स राखून पराभव केला. यामुळे थायलंडचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. आता उपांत्य फेरीत भारत विरुद्ध बांग्लादेश आणि श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा सामना असेल.

Asia Cup 2024 : श्रीलंकेने थायलंडला पाजलं पराभवाचं पाणी, 10 गडी राखून मिळवला विजय
Image Credit source: Twitter
Follow us on

वुमन्स आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने थायलंडचा 10 विकेट्स राखून धुव्वा उडवला. थायलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकला. थायलंडला 20 षटकात 7 गडी गमवून 93 धावा करता आल्या. तसेच विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेने सहज गाठलं. कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि विश्मी गुणरत्ने यांनीच ही विजयी धावसंख्या गाठली. चमारि अटापट्टू सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. या आधीच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. आता पुन्हा एकदा आक्रमक खेळी केली. तिचं अर्धशतक फक्त एका धावेने हुकलं. चमारी अटापट्टूने 35 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. यात 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. तर विश्मीने 34 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 39 धावा केल्या.

थायलंडकरून नन्नापत कोन्चारोएनकाई हीने एकटीने झुंज दिली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकली नाही. नन्नापतने 53 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. श्रीलंकेकडून कविशा दिल्हारीने 4 षटकात 13 धावा देत दोन गडी बाद केले. तर अचिनि कुलासुरिया, इनोशी प्रियदर्शनी,सुगंधिका कुमारी, आणि चमिरा अटापट्टूने प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयासह उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले आहे. अ गटातून भारत, पाकिस्तान आणि ब गटातून श्रीलंका, बांग्लादेश हे संघ असतील. भारताचा सामना बांग्लादेशशी, तर श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 26 जुलैला होणार आहेत. भारत बांग्लादेश यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता, श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामना संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 28 जुलैला होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

थायलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): नट्टाया बूचाथम, अपिसारा सुवांचोनराथी, नन्नापत कोन्चारोएनकाई (विकेटकीपर), फन्निता माया, चनिदा सुथिरुआंग, सुवानन खियाओटो, सुलीपोर्न लाओमी, रोसेनन कानोह, ओन्निचा कामचोम्फू, थिपत्चा पुत्तथावोंग (कर्णधार), चॅनिडा सुथिरुआंग.

श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चमारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी, अचिनी कुलासुरिया.