वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सातवा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. हा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. पण या विजयाला तसा काही अर्थच नव्हता असं म्हणायला हरकत नाही. भारताला काहीही करून स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. असं असताना भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 20 षटकात 8 गडी गमवून 105 धावा केल्या आणि विजयासाठी 106 धावा दिल्या. खरं तर नेट रनरेट सुधारण्यासाठी भारताला हे आव्हान 12 षटकात पूर्ण करणं गरजेचं होतं. पण भारतीय संघ पूर्णपणे दबावात असल्याचं दिसला. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी एकदम धीमी सुरुवात करून दिली. पॉवर प्लेच्या सहा षटकात 1 गडी गमवून फक्त 25 धावा आल्या. त्यामुळे 106 धावांचं आव्हान 12 षटकात पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झालं. मधल्या षटकात तर पाकिस्तानने जबरदस्त कमबॅक केलं. टीम इंडिया जिंकेल की नाही याबाबतच संशय आला. पण भारताने 19व्या षटकात पाकिस्तानने दिलेलं आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे गुण मिळाले पण नेट रनरेट काही सुधारता आला नाही.
भारताने पाकिस्तानला पराभूत करून 2 गुण मिळवले. पण पाकिस्तानचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत भारतापेक्षा वरचढ ठरला आहे. भारताने 2 गुणांची कमाई केली आहे. पण नेट रनरेट हा उणे 1.22 इतका आहे. तर पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करून आधीच 2 गुण मिळवले होते. पाकिस्तानचा नेट रनरेट हा 0.66 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर, तर भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. आता भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहेच. त्यासोबत नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला चार सामन्यात विजय मिळवण्याची, तर पाकिस्तान आणि भारत या संघांना प्रत्येकी तीन सामने जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरी गाठायची झाली तर सर्व गणित हे भारत-ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या सामन्यावर आहे. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं गरजेचं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केलं तरच भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटू शकतं. कारण भारताचा नेट रनरेट खूपच खराब आहे.