पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही टीम इंडियाकडून तीच चूक, आशा शोभनाने कित्ता गिरवला

| Updated on: Oct 06, 2024 | 4:45 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. भारतासाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव म्हणजे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात अशी स्थिती आहे. अशा महत्त्वाच्या आशा शोभनाने मोठी चूक केली.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही टीम इंडियाकडून तीच चूक, आशा शोभनाने कित्ता गिरवला
Image Credit source: video grab
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक राहिली. रेणुका सिंगने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गुल फिरोजाचा त्रिफळा उडवला. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव टाकण्याची मोठी संधी चालून आली होती. त्यानंतर पाचव्या षटकात दीप्ती शर्माने सिद्रा अमिनला तंबूचा रस्ता दाखवला. तेव्हा पाकिस्तानच्या 25 धावा झाल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानचे विकेट झटपट बाद करून सामन्यावर पकड मिळण्याची संधी होती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केलेली चूक पुन्हा एकदा घडली. अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर आशा शोभनाने हातातला सोपा झेल सोडला.जराही मेहनत न घेता हातात आलेला झेल पकडला जाईल असं वाटत होतं. पण झेल हातातून सुटला. त्यामुळे समालोचकापासून सर्वच अवाक् झाले. असा सोपा झेल सोडून वर्ल्डकपमध्ये कमबॅक करणं कठीण होईल.

ओपनिंगला आलेल्या मुनीबा अलीला बाद करण्याची संधी होती. अरुंधती रेड्डीकडे संघाचं सातवं षटक सोपवलं होतं. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मुनीबाला चकवा दिला आणि चेंडू थेट शॉर्ट फाईनला उभ्या असलेल्या आशा शोभनाच्या हाती गेला. पण सोपा झेल आशा शोभनाला पकडता आला नाही. त्यामुळे भारतीय चाहते प्रचंड नाराज झाले. पण याच पाचव्या चेंडूवर ओमैना सोहेलला बाद करण्यात अरुंधती रेड्डीला यश आलं. तिने मिड ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. पण चेंडू हवेत राहिला आणि थेट तिथे उभ्या असल्या शफाली वर्माच्या हाती गेला. मुनीबा अलीचा झेल सोडला तेव्हा ती 14 धावांवर होती.

मुनीबा अलीला मिळालेल्या जीवदानाचा फार काही उपयोग करता आला नाही. त्यात फक्त तिला 3 धावांची भर घालता आली. श्रेयंका पाटीलने तिचा बरोबर खेळ केला. पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर मुनीबाने तिसऱ्या चेंडूवर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. तिथेच मुनीबाची चूक झाली आणि चेंडू थेट विकेटकीपर ऋषा घोषच्या हाती गेला. यष्टीचीत करण्याची संधी ऋचा घोषने सोडली नाही. विशेष म्हणजे हे षटक श्रेयंका पाटीलने निर्धाव टाकलं.

आशा शोभना इतक्यावरच थांबली नाही. तिने 13 व्या षटकातही तीच चूक केली. फातिमा सानाचा सोपा झेल सोडला. तेव्हाही अरुंधती रेड्डीच षटक टाकत होती.  तिचं गचाळ क्षेत्ररक्षण पाहून प्रशिक्षकांच्या कपाळावर आठ्या पडल्याचं स्पष्ट दिसत होतं.  हा झेल पकडला असता तर फातिमाला आपलं खातंही खोलता आलं नसतं.