श्रीलंका वूमन्स क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने टीम इंडियावर 8 विकेट्सने मात करत वूमन्स आशिया कप फायनल 2024 ट्रॉफी जिंकली आहे. श्रीलंकेची ही आशिया कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. श्रीलंकेसाठी कॅप्टन चमारी अथापथू आणि हर्षिता समरविक्रमा या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. या दोघींच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला विजय मिळवता आला.
वूमन्स आशिया कप स्पर्धा 2004 पासून खेळवण्यात येत आहे. यंदाची ही 8वी स्पर्धा होती. श्रीलंकेला या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 5 वेळा अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. टीम इंडियानेच श्रीलंकेला पाचही वेळेस पराभूत केलं होतं. मात्र यंदा श्रीलंकेने बाजी मारली आणि 20 वर्षात पहिल्यांदाच आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश मिळवलं. श्रीलंकेच्या या विजयासह 2 दशकांची आशिया कप विजयाची प्रतिक्षा संपली. तसेच वूमन्सने टीम इंडियाला पराभूत करत मेन्स टीमच्या पराभवाचा वचपाही घेतला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा आशिया कप फायनल 2023 मध्ये धुव्वा उडवला होता.
श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्ने धावबाद झाली. तिने 1 धाव केली. कॅप्टन चमारी अथापथू हीने 43 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 61 रन्स केल्या. तर हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिलहारी या जोडीने श्रीलंकेला विजयी केलं. ही जोडी अखेरपर्यंत नाबाद राहिली. हर्षिताने 51 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 69 रन्स केल्या. तर कविशानेने 16 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हीच्या खात्यात एकमेव विकेट गेली.
श्रीलंका वूमन्स आशिया चॅम्पियन
Women’s Asia Cup 2024 champions 🏆🇱🇰#SLvIND 📝: https://t.co/gv9YqDRMZ8 | 📸: @ACCMedia1 pic.twitter.com/ibAUAin9dg
— ICC (@ICC) July 28, 2024
श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी आणि सचिनि निसांसला.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, उमा चेत्री, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.