T20 World Cup 2024 : पाकिस्तान जिंकला तर भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार, असं आहे संपूर्ण समीकरण

| Updated on: Oct 14, 2024 | 3:14 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा महत्त्वाचा सामना भारताने 9 धावांनी गमवला आणि उपांत्य फेरीचं गणित चुकलं. पण असं असलं तरी उपांत्य फेरीत भारतीय संघ जागा मिळवू शकतो. याबाबतचं सर्व गणित हे पाकिस्तान न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून आहे. नेमकं काय घडलं तर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल ते जाणून घेऊयात

T20 World Cup 2024 : पाकिस्तान जिंकला तर भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार, असं आहे संपूर्ण समीकरण
Image Credit source: BCCI
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दारुण पराभव केला. त्यामुळे नेट रनरेटचा मोठा फटका बसला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून भारताने कमबॅक केलं. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नेट रनरेटही सुधारला. पण उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना 9 विकेटने गमवला आणि सर्व गणित फसलं. भारताच्या उपांत्या फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. पण कुठेतरी अजूनही आशेचा दिवा मिनमिनत आहे. आता भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा या न्यूझीलंड पाकिस्तान या सामन्यावर आहे. भारतीय चाहते पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. कारण पाकिस्तानच्या विजयावरच भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. अ गटातून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली आहे. तर श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना दुसऱ्या संघासाठी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे.

असं सुटेल भारताचं उपांत्य फेरीचं गणित

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. सध्या भारत, न्यूझीलंडचे समान गुण आहेत. पण भारत नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडपेक्षा वरचढ आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना न्यूझीलंडने जिंकला तर उपांत्य फेरीत पोहोचेल. पण पराभव झाला तर भारताला उपांत्य फेरीची तितकीच संधी आहे. कारण नेट रनरेटच्या बाबतीत भारतीय संघ उजवा आहे. फक्त पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं की झालं. तसं पाहिलं तर पाकिस्तानलाही उपांत्य फेरीची संधी आहे. पण हे गणित खूपच कठीण आहे.

पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. प्रथम फलंदाजी आली तर 47 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे, धावांचा पाठलाग करण्याची वेळ आली तर 56 चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. पाकिस्तानची स्पर्धेतील कामगिरी पाहता अशा पद्धतीने विजय मिळवणं खूपच कठीण आहे. त्यामुळे पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तरी भारताला फायदा होईल. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांच्या नजरा या सामन्याकडे लागून आहेत.

भारताने 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. भारताचे 4 गुण आणि +0.322 नेट रनरेट झाला आहे. न्यूझीलंड आतापर्यंत 3 सामने खेळले असून 2 सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव मिळवून 4 गुण आणि +0.282 नेट रनरेट आहे. पाकिस्तानने 3 सामन्यात 1 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभव झाला आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट -0.488 इतका आहे. श्रीलंका या स्पर्धेतून आऊट झाला असून 4 पैकी 4 ही सामने गमावले असून 0 गुण आहे.