टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं भारताचं स्वप्न आता अधांतरीतच राहिलं आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मोठा गाजावाजा करत भारतीय महिला संघ जेतेपद मिळवणार असं सांगितलं जात होतं. पण पहिल्याच सामन्यात भारतीय संघाच्या पदरी मोठा पराभव पडला आणि सर्वच गणित चुकलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून निसटता पराभव झाला आणि पुढचा मार्गच बंद झाला. असं असूनही भारताच्या आशा या न्यूझीलंड पाकिस्तान सामन्यावर अवलंबून होत्या. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी घेतली. पाकिस्तानने चांगली गोलंदाजी करून न्यूझीलंडला 20 षटकात 6 गडी गमवून 110 धावांवर रोखलं. खरं तर हे सहज गाठता येणारं आव्हान होतं. पण पाकिस्तानचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 11.4 षटकात 56 धावा करू शकला. हा नुसता पाकिस्तानचा पराभव नव्हता तर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे.
वुमन्स टी20 वर्ल्डकप अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पात्र ठरले आहेत. तर श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ब गटातून बांगलादेशचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आशिया संघांची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली असंच म्हणावं लागेल. ब गटातून अजून एकही संघ पात्र ठरलेला नाही. या गटात एकदम चुरशीची लढाई आहे. सर्व गणित जर तरचं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा सामना होणार आहे. त्यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.
भारताने टी20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. भारताने 2020 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र तिथेही पदरी निराशा पडली होती. आता पुन्हा एकदा जेतेपदाची दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास