वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील लढत रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक संघाला फक्त 4 सामने खेळायचे असल्याने टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. दरम्यान ब गटात इंग्लंडने मोठी झेप घेत दोन पैकी दोन सामने जिंकत 4 गुण मिळवले आहेत. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून 124 धावा केल्या आणि विजयासाठी 125 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉल्वर्ड्टने जबरदस्त खेळी केली. तिने 42 धावा ठोकल्या होत्या. तिच्या या खेळीमुळे दक्षिण अफ्रिकेला 124 धावांपर्यंत मजल मारता आली. हे आव्हान इंग्लंडने शेवटच्या षटकात पूर्ण केलं. या धावांचा पाठलाग करताना डॅनली व्यॅट होडगेने 43 आणि नॅट स्कायवर ब्रंटने नाबाद 48 धावांची खेळी केली. या विजयासह इंग्लंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आता इंग्लंडने आणखी एक सामना जिंकला की उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होईल.
दुसरीकडे, दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात उपांत्य फेरीसाठी चुरशीची लढाई होणार आहे. इंग्लंडचे उर्वरित दोन सामने स्कॉटलँड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजसमोर इंग्लंडचं तगडं आव्हान असणार आहे. इंग्लंडने दोन पैकी दोन सामने जिंकत 4 गुण आणि +0.653 नेट रनरेटसह अव्वल स्थान गाठलं आहे. वेस्ट इंडिजने दोन पैकी एका सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभव सहन करत 2 गुणांसह +1.154 नेट रनरेटसह दुसरं स्थान पटकावलं होतं. दक्षिण अफ्रिकेने एका सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभव सहन करत +0.245 नेट रनरेटसह तिसरं स्थान पटकावलं आहे.
बांगलादेशने दोन पैकी एका सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभव सहन केला आहे. बांगलादेशने एका विजयासह 2 गुण आणि नेट -0.125 इतका आहे. त्यामुळे चौथ्या स्थानी आहे. तर स्कॉटलंडने दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. स्कॉटलंडचे 0 गुण असून नेट रनरेट -1.897 इतका आहे.