मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिकेने धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीच्या दोन स्थानासाठी चार संघांमध्ये चुरस आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांना उपांत्य फेरीची दारं खुली आहेत. त्यामुळे या चार पैकी कोणते दोन संघ उपांत्य फेरीत जागा मिळवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिग्गज संघांच्या रेसमध्ये अफगाणिस्तान असल्याने उपांत्य फेरी गाठणार का? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींना पडला आहे. गुणतालिकेत अफगाणिस्तानचा संघ 8 गुण आणि -0.330 नेटरनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. पण दोन सामने शिल्लक असल्याने प्लस पॉइंट आहे. त्यात अफगाणिस्तानने कमी लेखून चालणार आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने धडक मारली तर आश्चर्य वाटायला नको..चला जाणून घेऊयात अपगाणिस्तान उपांत्य फेरी कशी गाठणार ते..
अफगाणिस्तानने सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं. पहिल्या सामन्यात बांगलादेशने 6 गडी राखून पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला आणि इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर न्यूझीलंडकडून 149 धावांनी पराभव सहन करावा लागला.
पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 8 विकेट आणि 6 चेंडू राखून पराभूत केलं. त्यानंतर श्रीलंकेला 7 गडी आणि 28 चेंडू राखून पराभवाची धूळ चारली. नेदरलँडचा 7 गडी राखून पराभव केला. आता अफगाणिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.